“साता-याच्या संस्कृतीची कोल्हापूरातील अतिग्रेला देण”
सातारा -कूपर कार्पोरेशन आपल्या सामाजिक बांधिलकीतून विविध संस्थांच्या शाश्वत प्रकल्पांना मदत करत असते. 2023 ला दुष्काळ सदृश परिस्थिती असल्यामुळे कोल्हापूर नजीकच्या अतिग्रे येथे छ. राजर्षी शाहू महाराजांनी बांधलेला तलाव पूर्णपणे आटला व 6500 लोकसंख्या असलेल्या वस्तीच्या गावाला पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली. अतिग्रेचे तरूण सरपंच श्री सुशांत वड्ड यांना साता-यातील कूपरच्या दातृत्वाची माहिती मिळाली. पूर्वी साता-यात कार्यरत असलेले श्री विजय कुंभार यांच्या सोबत त्यांनी सातारा गाठला. श्री. फरोख कूपर साहेव यांना पाण्याच्या भीषण प्रश्नाची जाणीव करून दिली व त्याचप्रमाणे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ आधीच्या योजना असफल झाल्यामुळे मिळत नसल्याचे सांगितले.
अतिग्रेच्या शाहू तलावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने व ग्रामस्थांना पाण्याची सोय व्हावी या हेतूने कूपर साहेबांनी सातारा संस्कृतीने मोठ्या मनाने शाहू तलावात विहिर निर्माण व बांधण्याचे मान्य केले व 2024 साली विहिर खोदण्यास सुरुवात झाली.2024 मध्ये 50 फूट खोल व 50 फूट व्यासाची विहिर खोदण्याला सुरूवात झाली.
या विहिरीचा उद्घाटन सोहळा नुकताच कोल्हापूर जवळील अतिग्रे गावात पार पडला. या कार्यक्रमाला कूपर कार्पोरेशनचे मुख्य मानव संसाधन अधिकारी श्री. नितीन देशपांडे यांच्या हस्ते पूर्ण बांधकाम झालेल्या विहिरीचे उद्घाटन ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आले. आपल्या भाषणात श्री.नितीन देशपांडे यांनी कूपर घराण्याच्या ऐतिहासिक वारसा विषद केला.
अतिग्रेचे सरपंच श्री सुशांत वड्ड यांनी ग्रामस्थांच्या वतीने श्री. फरोख कूपर साहेबांचे मनः पूर्वक आभार मानले व हे ऋण आम्ही जन्मोजन्मी विसरणार नाही, अशी ग्वाही दिली. छ. राजर्षी शाहू महाराजांनी निर्माण केलेल्या तलावात या नवीन विहिरीच्या उद्घाटनाने गावातील 80% पाण्याचा प्रश्न सुटला आहे व उन्हाळयात सुद्धा या विहिरीमुळे गावात पाणी पुरवठा करणे शक्य झाले, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपसरपंच सौ कलावती गुरव, ग्रामपंचायत सदस्य श्री भगवान पाटील, सौ छाया पाटील, श्री. आबासो पाटील, सौ कल्पना पाटील, सौ दिपाली पाटील, श्रीमती आक्काताई शिंदे, श्री अनिरूद्ध कांबळे, श्री. राजेंद्र कांबळे, सौ वर्षा बिडकर, श्री नितीन पाटील व अतिग्रे ग्रामपंचायत अधिकारी श्री. बाबासाहेब कापसे यांच्या सोबतच विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, तरूण मंडळे, महिला बचत गट व सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
