संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या हक्काची पेन्शन मिळावी – अमोल शिंदे
संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन धारकांना त्यांच्या हक्काची पेन्शन ऑक्टोबर महिन्यापासून ते या महिन्यापर्यंत काही तांत्रिक कारणाने मिळाली नाही. संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेत निराधार, अपंग, अंध, अनाथ मुले, दीर्घ आजारी असणाऱ्या व्यक्ती अशांचा समावेश होतो. हे लाभार्थी असणारे लोक वयस्कर आणि आधारहीन असलेले आहेत. त्यांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे.
पेन्शन मिळणाऱ्या व्यक्तींना आपले खाते आधारशी लिंक करण्यास सांगण्यात येत आहे. पण पेन्शनधारक असणारे लाभार्थी हे निराधार, निरक्षर, अंध, अपंगत्व, आधारहीन असल्यामुळे त्यांना या गोष्टींची पूर्तता करणे अवघड आहे. तरी शासनाने ग्राम स्तरावरील महसूल विभागाची मदत घेऊन त्यांचे बँक खाते आधारशी लिंक करावे आणि त्या लाभार्थ्यांना त्यांचा हक्क लवकरात लवकर मिळवून द्यावा अशी मागणी सातारा विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अमोल शिंदे आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे राज्य सरकारकडे केली आहे. त्याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सातारा यांना दिले.
संबंधित लाभार्थ्यांची हक्काची पेन्शन तांत्रिक कारणांची पूर्तता करून लवकरात लवकर न मिळाल्यास लाभार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते लाभार्थ्यांसहित जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य सरकारचा विरोधात तीव्र आंदोलन करतील असा इशारा अमोल शिंदे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.यावेळी काँग्रेस पदाधिकारी विजय मोरे, संदीप माने, सुषमा राजेघोरपडे, प्राची ताकतोडे आणि अभय कारंडे उपस्थित होते.
