दिवाळी पूर्वीच ‘अजिंक्यतारा’ कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )ऊस उत्पादक व पुरवठादार शेतकरी वर्गच्या बँक खात्यावर दहा दिवसातच ऊस पेमेंट जमा करणारा साखर कारखाना अशी महाराष्ट्रात ख्याती असणाऱ्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी विशेष आनंददायी ठरणार आहे. कारखाना व्यवस्थापनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वीच, म्हणजेच २५ ऑक्टोबरपर्यंत देण्यात येणार आहे. हा निर्णय कारखान्यातील कामगार, अधिकारी यांचेबरोबरच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चिफ अकॉउंटन्ट प्रविण जाधव यांनी केले.
कामगार हिताचे निर्णय कळकळीने आमलात आणल्याबद्दल अजिंक्यतारा कामगार युनियनच्यावतीने साखर कारखान्याचे सर्वेसर्वा श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांचे विशेष आभार मनितच चिफ अकॉउंटन्ट प्रविण जाधव यांचा पत्रकार महेंद्रआबा जाधवराव यांचे हस्ते कृतज्ञता पूर्वक सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष कृष्णात धनवे, युनियनचे पदाधिकारी, सचिन जाधव, संजय काटे, दिलीप शेडगे, विकास कसम, शत्रुघ्न मोरे, विजय निकम, संतोष शिंगटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांनी तहयात सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार हिताचेच निर्णय राबविले. तोच आदर्श वारसा श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जोपासाला आहे. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. चेअरमन व संचालक मंडळ आणि कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते तसेच सर्व खाते प्रमुख यांच्या कल्पक आणि कुशल मार्गदर्शनाखाली अजिंक्यतारा साखर कारखान्याचा उत्तुंग भरारीचा आलेख सदैव उंचावत आहे.
सर्व कामगारांचा बोनस २२ ऑक्टोबर रोजी बँक खात्यात जमा करण्यात आला असून साखर कारखान्याच्या या निर्णयामागे अनेक महत्त्वाची कारणे आहेत. प्रथमतः, दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठा सण असून, या काळात कुटुंबासोबत वेळ घालवणे, नवीन वस्तूंची खरेदी करणे आणि घराची सजावट करणे या गोष्टी महत्त्वाच्या असतात. दिवाळी हा केवळ सण नसून कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवण्याची एक महत्त्वाची संधी असते. वेळेआधी वेतन मिळाल्याने कर्मचाऱ्यांना या सर्व गोष्टींचे नियोजन करणे सोपे जाणार असल्यामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
या निर्णयाचे आर्थिक परिणाम देखील महत्त्वाचे आहेत. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. कर्मचाऱ्यांना वेळेआधी वेतन मिळाल्याने, ते आपली खरेदी आधीच पूर्ण करू शकतील. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना देखील फायदा होईल आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
