सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आता ब्लॅक पॅंथर
बिबट्याचीही डरकाळी
चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघ वाघिणींचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे हा व्याघ्र प्रकल्प चर्चेत राहिला आहे. अशातच आता या राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅप मध्ये काळया बिबट्याची नोंद झाली.
चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये वाघ वाघिणींचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे हा व्याघ्र प्रकल्प चर्चेत राहिला आहे. अशातच आता या राष्ट्रीय उद्यानात २० एप्रिल रोजी कॅमेरा ट्रॅप मध्ये काळया बिबट्याची नोंद झाली. पुढच्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्याची तीन छायाचित्रे उपलब्ध झाली. बुधवारी राष्ट्रीय चांदोली राष्ट्रीय उद्यानात कॅमेरा तपासण्यासाठी गेलेल्या वन पथकाला या काळया बिबट्याचे छायाचित्र कॅमेराबद्ध झाल्याचे आढळले. अशा प्रकारची नोंद यापूर्वी कधी झालेली नव्हती.
काळा बिबट्या तथा ब्लॅक पॅंथर ही स्वतंत्र प्रजाती नव्हे तर बिबट्याचाच एक प्रकार मानला जातो. मेलानिन हे रंगद्रव्य शरीरात अधिक प्रमाणात झाल्याने त्याचा रंग पूर्णतः काळा दिसतो. काळया रंगाच्या ठिपक्यांचा पॅटर्न काही वेळा आढळतो. त्याची उपस्थिती ही वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने हा पुढील टप्पा गणला जात आहे.




