देशात विचारी,सदाचारी पिढी घडविण्यासाठी ग्रंथ वाचन आवश्यक – प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे
किसनवीर महाविद्यालयात वाचन कौशल्य व तंत्र विकास कार्यशाळेचे प्रभावी आयोजन
वाई, ता.८ : वाचन हेच जीवन आहे. शरीराचे पोषण करण्यासाठी जशी अन्नाची गरज असते,तसे मनाचे ,मेंदूचे पोषण करण्यासाठी बहुविध स्वरूपाच्या वाचनाची गरज आहे. वाचनाने माणूस घडतो. जीवन उदात्त व उन्नत होण्यासाठी स्वहितकारी व समाजहितकारी वाचन आवश्यक असते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आईनस्टाईन यारख्या जगातील ज्ञानी व्यक्ती वाचनातून विविध प्रकारचे ज्ञान मिळवून समाजाला योग्य मार्ग देणाऱ्या व्यक्ती झाल्या. आंबेडकर यांनी ग्रंथावर जेवढे प्रेम केले तेवढे कोणी केल्याचे ऐकिवात नाही. ज्ञान मिळविण्यासाठी स्वतःचे राजगृह हे घर त्यांनी ग्रंथालय बनविले. वाचनातून प्रेरणा घेऊन त्यांनी अस्पृश्यतेचा संमुळ नायनाट केला. देशाला एक करणारे संविधान लिहिले महात्मा गांधीजी ,रवींद्रनाथ,टागोर ,जवाहरलाल नेहरू इत्यादी विचारी माणसे जगातले ग्रंथ वाचत होती. आज समाजात ज्या विकृती निर्माण झाल्या आहेत, ते रिकामे डोके असल्याचे लक्षण आहे. चांगले संस्कार देणारी पुस्तके शोधून वाचली पाहिजेत. स्वर्ग प्राप्त करण्याच्या भ्रामक कल्पनेत न राहता बुद्धांनी सागीतल्याप्रमाणे बहुजन हिताय,बहुजन सुखाय असे आचरण पृथ्वीवर आवश्यक आहे. म्हणूनच देशात विचारी व सदाचारी पिढ्या घडविण्यासाठी ग्रंथ वाचनाची नितांत गरज आहे. असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या भाषा मंडळाचे संचालक प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे यांनी केले. ते येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अभियानांतर्गत ‘ वाचन कौशल्य : तंत्र व विकास ’ या कार्यशाळेतील दुसऱ्या व्याख्यानात ते वाचनसंस्कृती जोपासण्याची कारणे आणि उपाय या विषयाव प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भीमराव पटकुरे, बाळासाहेब कोकरे, ज्येष्ठ प्राध्यापक (डॉ.) सुनील सावंत, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रा. (डॉ.) विनोद वीर, ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोरात यांची उपस्थिती होती.
डॉ. वाघमारे म्हणाले, ‘ तंत्रज्ञानाने प्रगती होते हे जरी मान्य केले तरी कोणती प्रगती होते ? माणसाने पंचशील पालन केले नाही तर तंत्रज्ञानाचा दुरुपयोग सुरु होतो. समाजात समता,बंधुभाव ,व प्रेम निर्माण करण्यासाठी काम करायचे की द्वेष निर्माण करण्यासाठी ? हे कळण्यासाठी विवेकी .विचारी होणे आवश्यक आहे. वाचनाने बुद्धीचा विकास केला तरी ती बुद्धीचा सदुपयोग करण्याचे संस्कार आवश्यक आहेत. त्यामुळे ग्रंथ जरी वाचले तरी त्यात काय चांगले ,काय वाईट याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. सोशल मिडीयावर केले जाणारे वाचन सखोल नाही. त्यासाठी ग्रंथ विकत घेऊन वाचनाची सवय लावली पाहिजे. घरात सोने ,नाणे या संपत्तीला प्रतिष्ठा देण्याची प्रथा आता दूर करून घराघरात ग्रंथालय कसे होईल यासाठी काम करायला हवे. प्रत्येक लेखक आपल्या ग्रंथातून काहीतरी चांगला संदेश देत असतो. त्याचा शोध घेऊन प्रत्येकाने तो विचार आचरणात आणला पाहिजे. दलित साहित्याच्या वाचनाने आत्मभान जागृत होते. संतांनी, समाजसुधारकांनी समानतेच्या दिलेल्या मंत्राचा अंगीकार करुन जीवन जगायला हवे. त्यांच्या रस्त्यावरुन चालताना आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे, कारण वाचन हे जीवन आहे. त्यांनी आपल्या भाषणातून वाचनसंस्कृतीचे महत्त्व, ती वृद्धिंगत करण्याचे उपाय, उद्देश, वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे उदाहरणांसह विशद केली .
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, वाचनाने माणूस स्वयंप्रकाशित होतो. ग्रंथांमध्ये जीवनानुभव असतात त्याचा शोध घेता आला पाहिजे. ज्ञान आणि प्रेम यांचा संयोग व्यक्तीच्या अंगी असला पाहिजे. माणसाचे विचार चांगले असतील तर ती व्यक्ती माणूस म्हणून मोठी ठरते. आपली वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी समाजज्ञान आणि समाजभान असणे आवश्यक आहे. वाचनाचा संस्कार माणसाला प्रगल्भ बनवतो. निरंतर वाचनाने शब्दभांडार वाढते. समाजात बोलताना व वागताना अंगी नम्रता येते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रो. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. संग्राम थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमास डॉ. मंजुषा इंगवले, डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. अंबादास सकट, डॉ. संदीप वाटेगावकर, दीपाली चव्हाण,संदीप पातुगडे, तानाजी हाके, सोमिनाथ सानप, नीलम भोसले, रेश्मा मुलाणी, दीक्षा मोरे, मेघा शिर्के, सुलभा घोरपडे, जितेंद्र चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.