जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या राजश्री पाचणकर यांचे यश
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ साठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण क्षेत्रात नवीन, प्रभावी व विद्यार्थीकेंद्री अध्यापन पद्धती विकसित करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातील शिक्षकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
ही स्पर्धा शिक्षकांसाठी तीन गटांमध्ये घेण्यात आली होती पूर्वप्राथमिक (गट १), प्राथमिक (गट २) व माध्यमिक (गट ३). प्रत्येक गटामध्ये शिक्षकांनी आपल्या अध्यापनातील अभिनव प्रयोग, विद्यार्थ्यांच्या शिकण्याची गुणवत्ता वाढविणाऱ्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या उपक्रमांचे सादरीकरण केले.
या स्पर्धेत यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथील शिक्षिका सौ. राजश्री योगेश पाचणकर यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक (१ ला) पटकावला. त्यांच्या या यशामुळे शाळेचे तसेच यशोदा शिक्षण संस्थेचे नाव जिल्हाभर उज्ज्वल झाले आहे.
सौ. पाचणकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, विचारक्षमता आणि शिकण्यातील सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी तयार केलेल्या अभिनव अध्यापन पद्धतीला परीक्षकांनी विशेष दाद दिली. त्यांच्या या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण अधिक रंजक व समजण्यास सोपे होत असल्याचेही नमूद करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, डॉ. अजिंक्य सगरे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धुमाळे यांनीही त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आनंद व्यक्त करत त्यांच्या अभिनव शैक्षणिक कार्यपद्धतीचे कौतुक केले.
सौ. पाचणकर यांच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळणार असून इतर शिक्षकांनाही नवोपक्रम करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




