Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साहित्यिक ग्रंथसंपदा » कोणत्याही क्षेत्रामधल्या लीडरशिप साठी वाचन महत्त्वाचे : राजीव खांडेकर

कोणत्याही क्षेत्रामधल्या लीडरशिप साठी वाचन महत्त्वाचे : राजीव खांडेकर

कोणत्याही क्षेत्रामधल्या लीडरशिप साठी वाचन महत्त्वाचे : राजीव खांडेकर

 २४ वा ग्रंथ महोत्सव उद्घाटन सोहळा 

सातारा, दि. १०( प्रतिनिधी):- पुस्तके वाचणे व मिळेल ते वाचणे हे तरुणांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला जर कोणत्याही क्षेत्रांमधली लीडरशिप हवी असेल तर वाचणे हे खूप महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी केले.

    

                  ‘सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती ‘, आयोजित ग्रंथ महोत्सव २०२५ चोविसावा ग्रंथ महोत्सव येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी, जिल्हा परिषद मैदान येथे आयोजित करण्यात आले असून त्याच्या उद्घाटन सोहळ्यात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखक, कवी व गीतकार प्रवीण दवणे, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक सूर्यवंशी, जि. प. च्या माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, उपशिक्षणाधिकारी गंबरे, कार्यवाह शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष प्राचार्य वि. ना. लांडगे, कोषाध्यक्ष प्रदीप कांबळे, स्टॉल समन्वयक सुनिताराजे पवार, मुख्य समन्वयक आर. पी. निकम, सहसमन्वयक प्रल्हाद पारटे,डॉ. राजेंद्र माने, सुनिता कदम, नंदा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

                   राजीव खांडेकर पुढे म्हणाले, नव्या वाचकांच्या घडणीच्या दृष्टीने सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समिती पेरणी करीत असून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर पुस्तके विकली जात आहेत, हे कौतुकास्पद आहे. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, आपल्याला आवडणारी पुस्तके या ग्रंथ महोत्सवांमधून विकत घ्या, व प्रत्येकाने छोटे ग्रंथालय तयार करा, असे आवाहन त्यांनी केले. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये असा तुम्हाला जे उत्तम येतं ते तुम्ही शिकलं पाहिजे. आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त इंट्रेस्ट आहे, हे आपल्याला कळले पाहिजे त्या क्षेत्रामध्ये आपण प्रावीण्य मिळवले पाहिजे. आपण आयुष्यामध्ये पुस्तकी पांडित्यापेक्षा चांगले नागरिक म्हणून कसे राहतोय हे महत्त्वाचे आहे. देशाचा चांगला नागरिक होणे हे जास्त महत्वाचे आहे.

                 प्रवीण दवणे म्हणाले, वाचनाचा मधुमेह मला असल्यामुळेच मी ग्रंथांचे पेढे खातो.माझे भाग्य चांगले असल्यामुळे मी वयाच्या अठराव्या वर्षी मी यशवंतराव चव्हाण यांना भेटलो. ग. दि. माडगूळकर यांच्या गीतरामायणावर यशवंतराव चव्हाण माझ्याशी अर्धा तास बोलत होते. व्यक्तीच्या अंगी चातुर्य हवे पण चलाखी नको, असे सांगून ते पुढे म्हणाले, वाचनाची माध्यमे बदलू देत. यंत्रांच्या सहाय्याने तुम्ही कितीही मजकूर वाचा परंतु कागदावरील वाचलेला मजकूर मनामध्ये उतरतो. केवळ कागदावरच्या फतव्यांनी वाचन संस्कृती वाढणार नाही. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, तुम्ही प्रत्येक स्टॉलला भेट द्या, तेथील पुस्तके खरेदी करून घरामध्ये एक छोटे ग्रंथालय तयार करा असे आवाहन त्यांनी केले. घरात वाचनाचे पर्यावरण पाहिजे. जीवनातले प्रश्न अनपेक्षित असतात ते प्रश्न अपेक्षितपणे सोडवण्यासाठी पुस्तकांची कास धरली पाहिजे. वय पुसण्याचे सामर्थ्य पुस्तकामध्ये असते.

                     श्री. सूर्यवंशी म्हणाले, सातारा शहराची व जिल्ह्याची वेगवेगळ्या बाबतीत ख्याती आहे. ही ओळख देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आहे. अत्यंत कमी खर्चात सर्वांना भावणारा ग्रंथ महोत्सव साजरा होत आहे. विद्यार्थ्यांच्या मोबाईल वेडाबाबत ते म्हणाले, तुम्ही काय पाहत आहात? हे महत्त्वाचे आहे. मग तो मोबाईल असला तरी चालेल. नवीन शैक्षणिक धोरण जागतिक स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी पूरक आहे. विद्यार्थ्यांना आनंददायी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे.

                      प्रभावती कोळेकर म्हणाल्या, गेली २४ वर्ष ग्रंथ महोत्सव समिती उत्स्फूर्तपणे काम करीत असून, महान व्यक्ती तुमच्या भेटीला आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे वाचन करून ज्ञानाच्या कक्षा रुंदवाव्या, असे आवाहन त्यांनी केले.

                    शिरीष चिटणीस म्हणाले, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तरुण मंडळींना पुढे आणण्याचे काम एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर करत आहेत, ते युथ आयकॉन आहेत. मोठमोठ्या शहरांमधील मराठी साहित्य संमेलनात जेवढी पुस्तक विक्री होत नाही त्यापेक्षा जास्त पुस्तक विक्री या ग्रंथ महोत्सवामध्ये होत आहे. आज या ठिकाणी पुस्तकांचे शंभर स्टॉल भरलेले आहेत. या ग्रंथ महोत्सवांमधील झालेल्या विविध कार्यक्रमामुळे तरुण पिढीला एक व्यासपीठ मिळालेले आहे. या ठिकाणी ज्यांना ज्यांना व्यासपीठ मिळाले तो तरुण वर्ग आज विविध ठिकाणी, विविध क्षेत्रांमध्ये आपली उत्तुंग असे कर्तुत्व दाखवून देत आहे. या पुढील कालावधीमध्ये मराठी भाषा ही सत्तेची भाषेबरोबरच आर्थिक भाषा कशी होईल, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

                 यावेळी ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी लिहिलेल्या ‘ज्ञानाचे लावण्य ‘ व ‘ घरात एक ग्रंथघर हवे ‘, या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच, येथील न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी श्रीतेष संदीप काळे या विद्यार्थ्याने सात महिन्यांमध्ये १२५ पुस्तके वाचल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास विविध विद्यालयांचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन सुनीता कदम यांनी केले. आभार आर.पी. निकम यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद(आबा) जाधव -पाटील 

Post Views: 95 राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद(आबा) जाधव -पाटील  सातारा प्रतिनिधी |

Live Cricket