पुण्यातील महत्त्वाचा वाहतुकीचा समजला जाणारा भिडे पूल दीड महिना वाहतुकीसाठी बंद राहणार
पुणे मेट्रोच्या डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनजवळ पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. हा पूल तब्बल दीड महिने बंद राहणार असल्याने, या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
कुठलीही पूर्वसूचना न देता हा पूल अचानक बंद केल्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे. मेट्रो प्रशासनाने कामामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व असल्याची पाटी पुलाजवळ लावली आहे. वाहतूक विभागातर्फे लवकरच पर्यायी मार्ग जाहीर केले जातील असे अपेक्षित आहे.बाबा भिडे पूल हा मुठा नदीवर असून, शहराच्या मध्यवर्ती भागांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे. नारायण पेठ, सदाशिव पेठ, यांसारख्या पेठांमधून तसेच उपनगरांतून जे. एम. रोड एफ. सी. रोड यांसारख्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक याच पुलाचा वापर करतात.
