पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ गुरुवारी दुपारी एका खासगी प्रवासी बसला अचानक आग
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील ससेवाडी फाट्याजवळ गुरुवारी दुपारी एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखून बसचालकाने सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बस साताऱ्याकडून पुण्याच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघाली होती. दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास बस ससेवाडी फाट्यावरील मायक्रो कंपनीसमोरील उड्डाणपुलावर आली असताना बसच्या मागील भागातून धूर निघताना बसचालकाच्या लक्षात आले. आरशातून ही बाब लक्षात येताच, चालकाने प्रसंगावधान राखत बस तात्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली व सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. काही क्षणातच आगीने उग्ररूप धारण केले आणि संपूर्ण बस आगीत भस्मसात झाली.
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे पेट्रोलिंग पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या. त्याचबरोबर शेजारी असलेल्या डब्ल्यूओम कंपनीने तातडीने आपली अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा रक्षक घटनास्थळी पाठवले. त्यांच्या प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. यासंबंधी अधिक तपास सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आगीमुळे संपूर्ण बस जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
