Home » Uncategorized » मन सुंदर होण्यासाठी अध्यात्म वाचले पाहिजे:- प्राची गडकरी

मन सुंदर होण्यासाठी अध्यात्म वाचले पाहिजे:- प्राची गडकरी

मन सुंदर होण्यासाठी अध्यात्म वाचले पाहिजे:- प्राची गडकरी

       सातारा, दि. १५( प्रतिनिधी):- मन सुंदर व कणखर होण्यासाठी वाचन केले पाहिजे. ग्रंथा मधून तुम्हाला संस्कार सुद्धा मिळतात म्हणून अध्यात्म वाचले पाहिजे, असे प्रतिपादन संत साहित्याच्या अभ्यासिका प्राची गडकरी यांनी केले.

         सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने आयोजित 24 वा ग्रंथ महोत्सव तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरी, जिल्हा परिषद मैदान, सातारा येथे आयोजित करण्यात आला होता त्यावेळी इथे घडतात वाचक वक्ते : मला आवडलेले पुस्तक या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी दैनिक तरुण भारत सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन,जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली, कार्यवाह शिरीष चिटणीस, नंदा जाधव, प्रल्हाद पारटे, प्रकाश बडदरे आदी उपस्थित होते.

               प्राची गडकरी पुढे म्हणाल्या, ग्रंथ हे नवीन विचारधारा घेऊन सतत वाहत असतात. पुस्तकामुळे कोणताही विषय नवीन पिढीला मिळत जातो. श्लोकांची एकूण बेरीज चार लाख 32 हजार होते. चार वेद अठरा पुराणांची ही टोटल मारलेली आहे. जेव्हा तुमचे मन भानावर असते तेव्हाच तुमचे चांगले वाचन होईल, असे मत व्यक्त करून त्यापुढे म्हणाल्या, आपल्या ग्रंथांचा जो पाया आहे तो कथा आहे. श्रवण ही सुद्धा भक्ती आहे. जो माणूस चांगला वाचतो तो चांगला बोलू शकतो. वाचन ही गोष्ट मनात घर करून राहते. वाचल्यानंतर त्या कथेतील सार आपल्या मनामध्ये घर करते. तुम्ही काय वाचता तुम्ही काय करता हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा मन एकाग्र होते, तेव्हा तुम्ही वाचू शकता वाचल्यानंतर तुम्ही बोलू शकता.

                दीपक प्रभावळकर म्हणाले, मुले आजकाल वाचत नाहीत असे आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी लेखकांच्या व पुस्तकांच्या मर्यादा आपण ओळखत नाही. काही विद्वान शिक्षकांच्या कविता चांगल्या आहेत मात्र त्यांचेही प्रमाण कमी आहे. इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना माहिती व्हावी म्हणून गड किल्ल्यावरची पुस्तके लिहायची, त्यामध्ये नंबर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिवप्रताप दिनी प्रतापगडावर सत्कार करावा, असे ठरवण्यात आले होते. वाचन उपक्रम वाढवण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम राबवले. शासन स्तरावर पुस्तकांचे गाव भिलार येथे आहे, मात्र दुर्दैवाने भिलार हे पर्यटन क्षेत्र असल्याने पुस्तकांच्या गावाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. वाचन संस्कृती कशी वाढवावी, हे सातारा येथील ग्रंथ महोत्सवाने आम्हाला शिकवले आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईल सुद्धा वापरला पाहिजे हे माझे मत असून मोबाईल वापराचा कोणताही अतिरेक नको, असे मत त्यांनी व्यक्त केले. मोबाईल मध्ये काय वाचले पाहिजे, मोबाईल मध्ये काय बघितले पाहिजे, ही निश्चित झाले पाहिजे तसेच पालकांचा आपल्या मुलावर त्याबाबत कटाक्ष असला पाहिजे. शाळा, लेखक यांच्या मर्यादा आहेत त्या आपणओळखल्या पाहिजेत. दिल्लीच्या सरकारी शाळेमधील इयत्ता आठवी चा मुलगा इटलीचे इमिग्रेशन कसे करायचे, हे आम्हाला ऑनलाईन दाखवत होता, आपण या नवीन पद्धती सुद्धा शिकल्या पाहिजेत, असे माझे मत आहे.

               याशनी नागराजन म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी आपल्या इयत्ते साठी निवडून दिलेले क्रमिक पुस्तक वाचलेच पाहिजे त्याचबरोबर इतर पुस्तके पण वाचली पाहिजेत. कारण क्रमिक पुस्तकांना एक प्रकारची मर्यादा येते. सर्व प्रकारचे ज्ञान तुम्हाला ती पुस्तके देऊ शकत नाहीत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रे वाचावीत, तसेच या ठिकाणी भरलेल्या ग्रंथ महोत्सवांमधून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला जमेल त्याप्रमाणे पुस्तक खरेदी करून स्वतःचे घरामध्ये एक छोटेसे ग्रंथालय निर्माण करावे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले कारण त्यांनी खूप वाचन केले होते.

                 ग्रंथ महोत्सव ही काळाची गरज असून, स्वातंत्र्य समता व बंधुतेसाठी पुस्तकांची गरज आहे, असे श्रीनिवास मंगलपल्ली यांनी सांगितले. महाराष्ट्रात सर्वात जास्त पुस्तक विक्री या ग्रंथ महोत्सवा मधून होत असून या ग्रंथ महोत्सवा मधील कार्यक्रमांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले त्यांनी आयुष्यामध्ये मोठे करिअर केले, असे प्रतिपादन शिरीष चिटणीस यांनी केले.

                या कार्यक्रमात वेदिका पांढरे, श्रावणी मोरे, शौर्या फाळके, श्रेया यादव, पूर्वा मोहिते, स्वरा खरात, सृष्टी कुंभार, हिंदवी कुचेकर, समर्थ पाटील, व्यंकटेश पाटील, गाथा भुजबळ, अवनी सावंत, रुद्रांश जगताप, भाग्यश्री व्हरकटे, ईश्वरी डेरी या विद्यार्थ्यांनी मला आवडलेले पुस्तक यावर मनोगत व्यक्त केले.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदा जाधव यांनी केले. आभार प्रदीप कांबळे यांनी मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’

Post Views: 19 वाई फेस्टिवल २०२५ : जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत शंतनू येवले ‘उत्कर्ष श्री’ उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई

Live Cricket