पोवई नाका येतील यशवंतराव चव्हाणसाहेब पुतळा परीसराचे सुशोभीकरनासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना साधू चिकणे यांनी दिले निवेदन
सातारा प्रतिनिधी -मा.यशवंतराव चव्हाण हे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता.
यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्त्व इत्यादीशी निगडीत आहेत. यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकीहक्काचा प्रश्न, भूमिहीनांचा प्रश्न व कृषी विकासासाठी उपाय यावर अधिक भर दिला. त्यांच्या मते, जमीन कसणारा शेतजमिनीचा मालक असावा. यशवंतरावांनी सामाजिक क्षमता व सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून शेतीचा विचार केला.
अशा शिल्पकाराचा सातारा येते पोवईनाका या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला आहे. सदर पुतळा फार जुना असल्याने त्याच्या सभोवताली परिसराचे सुशोभिकरण करणे आवश्यक आहे. याबाबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांचेशी चर्चा झाली असून जिल्हा परिषद स्वनिधीमधून याबाबत विशेष बाब म्हणून तरतुद करुन तात्काळ सुशोभिकरण करावे असे सांगितले आहे. याबाबत कारवाई करून निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जावली तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी सातारा जिल्हा परिषद मुख्याधिकारी याशनी नागराजन यांना निवेदन दिले.
यशवंतराव चव्हाण साहेब यांचा पुतळा हे शहराचे वैभव असून याचे सुशोभीकरण झाल्यामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडेल त्यामुळे प्रशासनाने ही मागणी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जावली तालुका अध्यक्ष साधू चिकणे यांनी केली आहे.
