महाबळेश्वरचे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील शिंदे पश्चिम महाराष्ट्र नगर परिषदा महासंघाचे उपाध्यक्ष
महाबळेश्वर : महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र नगर परिषदा महासंघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विकासकामांना गती देणारे आणि प्रभावी नेतृत्वासाठी ओळखले जाणारे सुनील शिंदे यांच्या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या संघटनात्मक बळकटीस नवे नेतृत्व लाभले आहे. महाबळेश्वर नगरपरिषदेच्या निवडणुकीत जनतेतून थेट निवडून आलेले शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
पर्यटननगरी महाबळेश्वरचा सुनियोजित विकास, प्रशासकीय समन्वय आणि लोकाभिमुख कारभार याची दखल घेत महासंघाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनील शिंदे म्हणाले, “पश्चिम महाराष्ट्र नगर परिषदा महासंघाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महासंघाच्या माध्यमातून नगर परिषदांचे प्रलंबित प्रश्न, विकास आराखडे तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे.
महाबळेश्वरच्या जनतेने आणि पक्ष नेतृत्वाने दिलेल्या पाठबळामुळेच मला हा सन्मान मिळाला आहे.”सुनील शिंदे यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून महाबळेश्वर शहरासाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.




