Home » ठळक बातम्या » कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण

येळगावला प्रचार सभा ; महायुती सरकारचे काढले वाभाडे

कराड : कराड दक्षिणमधील विरोधकांनी जनतेच्या पैशातून उभ्या केलेल्या संस्था खाजगी करून त्याद्वारे अर्थकारण करत त्याच जनतेची पिळवणूक केली आहे. सहकारी संस्था खाजगी करण्याचा त्यांचा डाव यापुढे कायम राहील. त्यांची ही दृष्टी जनतेने ओळखली आहे. त्यांना समाजाच्या भल्यापेक्षा आपला व्यक्तिगत विकास महत्वाचा वाटतो. त्यामुळे कराड दक्षिणमधील जनता आपला स्वाभिमान गहाण न ठेवता तो जपणार. असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. 

येळगाव (ता. कराड) येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अॅड उदयसिंह पाटील – उंडाळकर, अजितराव पाटील – चिखलीकर, प्रा. धनाजी काटकर, युवा नेते इंद्रजित चव्हाण, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते पैलवान तानाजी चवरे, कराड पंचायत समितीच्या माजी सभापती फरिदा इनामदार, किसनराव जाधव, सरपंच अनुराधा माने, यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुती व गद्दारांचा दणदणीत पराभव केला. ४८ पैकी ३१ जागा महाविकास आघाडीला मिळाल्या. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील जनतेने जातीयवादी पक्षाला कधीही स्थान दिलेले नाही. ती परंपरा जपा.  

कराडच्या जनतेने मला आशीर्वाद दिल्यामुळे मी पहिल्यांदा खासदार झालो. त्यावेळेस मी चांगले काम केले म्हणून मला सोनिया गांधी व मनमोहन सिंग यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले. तेथेही मी चांगले काम केले. आणि मला पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर मी महाराष्ट्राच्या भल्याकरीता अनेक निर्णय घेतले. व कराड दक्षिणमध्ये १८०० कोटीची कामे केली. 

पुढे आ. चव्हाण म्हणाले, त्यानंतरही मतदारसंघात भरीव कामे केली. पण निवडणुकीच्या तोंडावर कराड दक्षिणमधील काहींनी विकासाची केवळ बॅनरबाजी केली आहे. गेल्या दहा वर्षात भाजपचे सरकार असताना ते कुठे होते. हे समजायला लोकं दूधखुळी नाहीत. 

 अॅड उदयसिंह पाटील – उंडाळकर म्हणाले,विरोधकांनी लोकांच्या जीवावर व्यक्तिगत स्वार्थासाठी संस्था उभा केल्या. त्या संस्था काँग्रेसच्या देण आहेत. व त्या सर्वसामान्य जनतेच्या खिशातील पैशातून तयार झाल्या आहेत. कराड दक्षिणमध्ये स्थापनेपासून तयार झालेली विचारसरणी जोपासणे महत्वाचे आहे. 

ते म्हणाले, रयत सहकारी साखर कारखाना उसाला ३१५० रुपये दर देवू शकतो. मग ५० वर्षांपासून सुरू असलेले कारखाने ३१०० दर देतात, हे कशाचे द्योतक आहे. सामान्य माणसाच्या हातात अर्थकारण जाता कामा नये, ही त्यांची विचारसरणी आहे. हे यातून स्पष्ट होते. 

प्रा. धनाजी काटकर, शेवाळे गुरुजी, संतोष थोरवडे यांची भाषणे झाली. राजेंद्र जाधव यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी चवरे यांनी आभार मानले.

अजितराव पाटील – चिखलीकर म्हणाले, आ. पृथ्वीराज चव्हाण हे सर्वसामान्य जनतेने मोठे केलेले नेतृत्व आहे. त्यांचे विचार राष्ट्रीय विचारधारा व विकास जपणारे आहेत. त्यांनी केंद्रात मंत्री असताना अणुकरार केला. अतुल भोसलेंना फक्त कारखान्यातील ऊस तोडणीचे करार माहिती आहेत. यशवंतराव मोहिते नसते, तर कृष्णा कारखाना उभा राहिला नसता. असे सांगताच एकच हशा पिकला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन

Post Views: 19 गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे जल्लोषात उद्घाटन महाबळेश्वर : गिरिस्थान प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक

Live Cricket