Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साताऱ्यात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

साताऱ्यात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

साताऱ्यात राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन

सातारा : विद्यार्थ्यांमधील कल्पनाशक्ती, सृजनशीलता आणि कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने सक्सेस ॲबॅकस अँड वेदिक मॅथ्स तर्फे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे दुसऱ्या वर्षी आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १.०० या वेळेत यशोदा शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्यालय, सातारा येथे होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या राज्यस्तरीय स्पर्धेचा पहिला टप्पा मागील आठवड्यात सांगली, कराड आणि कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या ठिकाणी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेक विद्यार्थ्यांनी आपली कल्पकता आणि कलागुण प्रभावीपणे सादर केले. त्यानंतर आता या स्पर्धेचा पुढील टप्पा सातारा येथे आयोजित करण्यात आला आहे.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी दोन गट ठेवण्यात आले आहेत. लहान गट (इयत्ता १ ली ते ४ थी) आणि मोठा गट (इयत्ता ५ वी ते ८ वी) अशा दोन विभागांमध्ये स्पर्धा होणार आहे. लहान गटासाठी सजवलेला हत्ती किंवा ऊंट तसेच फुलपाखरू व फुलवाला हे विषय देण्यात आले आहेत. तर मोठ्या गटासाठी ऐतिहासिक प्रसंग (बाल शिवाजी), पतंग उडवणारी मुले/मुली आणि सहल – वस्तुसंग्रहालय पाहणारी मुले/मुली हे विषय निश्चित करण्यात आले आहेत.

याशिवाय आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च) विशेष महिला गट (वय २५ ते ४५ वर्षे) देखील आयोजित करण्यात आला आहे. या गटासाठी नारीशक्ती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रसंग तसेच वीरमाता – जिजाऊ, मदर तेरेसा, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारखे विषय देण्यात आले आहेत. या गटातील विजेत्यांना पहिले, दुसरे व तिसरे बक्षीस म्हणून पैठणी व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

विद्यार्थी गटातील विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार असून प्रथम क्रमांकासाठी ₹२५,०००, द्वितीय क्रमांकासाठी ₹१५,००० आणि तृतीय क्रमांकासाठी ₹१०,००० अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकूण १ लाख रुपयांची बक्षिसे या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आली आहेत. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ₹३५० ठेवण्यात आले असून नोंदणीची अंतिम तारीख ६ मार्च २०२६ आहे. या स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ ५ मे २०२६ रोजी सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थी व महिला कलाकारांनी या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८८८८५ ६००११ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket