लोकनेते विलासकाका उंडाळकर यांची १५ जुलैला ८८ वी जयंती कराडमध्ये अभिवादन कार्यक्रम; नागरिकांनी सहभागी होण्याचे रयत संघटनेचे आवाहन
कराड प्रतिनिधी –सहकार चळवळीला नवी दिशा देणारे, ग्रामीण विकासाचे शिल्पकार आणि राज्याचे माजी सहकार मंत्री लोकनेते स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांची ८८ वी जयंती बुधवार, दि. १५ जुलै रोजी कराड येथे विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात येणार आहे. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी कोयना सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासमोरील लोकनेते विलासकाका पाटील प्रवेशद्वार, मार्केट यार्ड येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी आयोजन करण्यात आले आहे.
स्व. विलासकाका उंडाळकर यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सार्वजनिक जीवनाची सुरुवात करत सलग ३५ वर्षे आमदार म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व केले. राज्य शासनात विविध खात्यांचे मंत्री म्हणून काम करताना सहकार, शेती, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत विकासाची वाटचाल घडवून आणणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे.
सहकार क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित अभिवादन कार्यक्रमास सहकार क्षेत्रातील पदाधिकारी, विविध संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन करावे, असे आवाहन रयत संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.





