यशोदा इन्स्टिट्यूट्समध्ये एकदिवसीय फुटबॉल स्पर्धा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना व नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी उपक्रम; प्रा. डॉ. दशरथ सगरे यांचे प्रतिपादन
सातारा : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा इन्स्टिट्यूट्स, सातारा यांच्या वतीने संस्थेअंतर्गत १४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या एकदिवसीय फुटबॉल स्पर्धा यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या प्रशस्त क्रीडांगणावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. विविध शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला.
स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “फुटबॉल हा केवळ एक खेळ नसून शिस्त, संघभावना, नेतृत्व, आत्मविश्वास आणि चिकाटी यांचे प्रभावी शिक्षण देणारे माध्यम आहे. विजय किंवा पराभवापेक्षा उत्कृष्ट खेळ, क्रीडाभावना आणि परस्परांबद्दलचा आदर अधिक महत्त्वाचा आहे. अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडतो.” त्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांना आगामी क्रीडा व युवा सेवा संचालनालयाच्या तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांसाठी सक्षमपणे तयार करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, वेग, चपळता, सांघिक समन्वय आणि क्रीडाशिस्त यांचे प्रभावी प्रदर्शन करत उपस्थितांची मने जिंकली. खेळाडूंनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धात्मक खेळ सादर करत क्रीडाभावनेचा आदर्श घालून दिला.
यावेळी संस्थेचे कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे, पॉलिटेक्निकच्या प्राचार्या डॉ. सौ. एम. एस. जाधव, यशोदा टेक्निकल कॅम्पसचे शारीरिक शिक्षण संचालक डॉ. अजितसिंह भोसले, अनिकेत शिंदे, वैशाली शिंदे, यशोदा पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक मधुसूदन महाडिक, साक्षी जाधव, केतन चव्हाण, साधना इंग्लिश मीडियम स्कूलचे मंथन पवार, अश्विनी निकम, राकेश मांजी, तसेच साधना माध्यमिक विद्यालयाचे हृषिकेश फरांदे, धुमाळ मॅडम आणि जगदाळे सर उपस्थित होते.
यावेळी डॉ. अजितसिंह भोसले यांनी संस्थेच्या क्रीडा उपक्रमांविषयी माहिती देताना लवकरच व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, क्रिकेट, अॅथलेटिक्स, टेबल टेनिस, बुद्धिबळ तसेच विविध इनडोअर स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपले क्रीडा कौशल्य विकसित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्पर्धेचे नियोजन यशोदा इन्स्टिट्यूट्सच्या क्रीडा विभागाने उत्कृष्टरीत्या केले. संपूर्ण दिवस रंगलेल्या या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी क्रीडा विभागाचे विशेष कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शारीरिक शिक्षण संचालक अनिकेत शिंदे यांनी केले.




