जागतिक महिला दिनानिमित्त धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेचे वतीने विशेष सत्कार समारंभ
सातारा -जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सहकार भुषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सातारा यांच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रम दि. ०९ मार्च २०२६ रोजी दुपारी ०४:०० वाजता संस्थेच्या धन्वंतरी भवन, ९३, शनिवार पेठ, सातारा येथील सांस्कृतीक हॉलमध्ये आयोजित करण्यात येत असून या कार्यक्रमामध्ये सातारा शहरातील सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक तसेच महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे.
आजच्या आधुनिक युगात महिलांचे समाजातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाने आणि परिश्रमाने उल्लेखनीय यश संपादन करून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अशा कर्तृत्ववान महिलांना प्रोत्साहन देणे, त्यांचे कार्य समाजासमोर आणणे तसेच महिला सक्षमीकरणाला चालना देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या समारंभामध्ये निवड करण्यात आलेल्या महिलांना प्रमुख अतिथी प्रा. संध्या चौगुले यांचे उपस्थितीत सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान महिला सक्षमीकरण, समाजातील महिलांची भूमिका तसेच त्यांच्या प्रगतीविषयी मार्गदर्शनपर मनोगते देखील मान्यवरांकडून व्यक्त करण्यात येणार आहेत. याप्रसंगी प्रा. सध्या चौगुले या “जग बदलणा-या सामान्य स्त्रिया” या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.
सदर कार्यक्रमासाठी पतसंस्थेच्या सर्व महिला सभासदांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा आणावी, असे आवाहन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, डॉ. रविंद्र नामदेव भोसले व संचालक मंडळ व व्यवस्थापन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम महिला सन्मान, प्रेरणा आणि समाजातील सकारात्मक बदल घडविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येत असल्यामुळे सर्व महिला सभासदांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यासाठी सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.




