व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर उत्तर कोरियाचा अमेरिकेला इशारा
अमेरिकेने व्हेनेझुएला या देशावर हवाई हल्ला करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यासह त्यांच्या पत्नीला अटक केलं. तसेच निकोलस मादुरो यांच्यावर आता अमेरिकेत खटला चालवला जाणार आहे.
अमेरिकेने व्हेनेझुएलावरील केलेल्या हल्ल्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली असून अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला. रशिया, चीन, भारत, उत्तर कोरिया यासह अनेक देशांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. उत्तर कोरियाने या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत अमेरिकेने केलेला हा हल्ला सार्वभौमत्वाचं गंभीर उल्लंघन असल्याचं म्हणत गंभीर इशारा दिला आहे.
उत्तर कोरियाने व्हेनेझुएलावरील अमेरिकेच्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि हे ‘सार्वभौमत्वाचं सर्वात गंभीर उल्लंघन’असल्याचं म्हटलं आहे. कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी (केसीएनए)च्या हवाल्याने टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं की, ‘व्हेनेझुएलावरील हल्ला म्हणजे अमेरिकेच्या दुष्ट आणि क्रूर स्वभावाचा आणखी एक पुरावा आहे.’
उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने इशारा दिला की, अमेरिकेच्या या कृतींमुळे प्रादेशिक अस्थिरता आणखी वाढेल. या हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला धक्का बसला आहे. मात्र, व्हेनेझुएलावरील परिस्थितीवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहेत. ही घटना पुन्हा एकदा अमेरिकेच्या क्रूर आणि निर्दयी स्वभावाची पुष्टी करते. आंतरराष्ट्रीय समुदाय हे बऱ्याच काळापासून पाहत आहे, असंही उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं.
अमेरिका आणि लॅटिन अमेरिकन देश असलेल्या व्हेनेझुएलाचे संबंध गेल्या अनेक वर्षांपासून ताणले गेले आहेत. व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दुसरीकडे व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. या दरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंध देखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अमेरिकेचे हे पाऊल वसाहतवादी असल्याची टीका व्हेनेझुएलाकडून करण्यात आली होती.
अमेरिकेने शनिवारी व्हेनेझुएलावर हवाई हल्ला केला. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेच्या डेल्टा फोर्सच्या जवानांनी ताब्यात घेतले. राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना ताब्यात घेऊन अमेरिकन सैनिकांनी व्हेनेझुएलातून अमेरिकेत नेले आहे. या पार्श्वभूमीवर व्हेनेझुएलातील सर्वोच्च न्यायालयाने उप-राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केली आहे.
निकोलस मादुरो यांच्या अनुपस्थितीत आता डेल्सी रॉड्रिग्ज व्हेनेझुएलाची सत्ता सांभाळणार आहेत. डेल्सी रॉड्रिग्ज यांनी मादुरो यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. व्हेनेझुएलातील नागरिकांचे संरक्षण व प्रशासन सांभाळण्यासाठी डेल्सी रॉड्रिग्ज यांची अंतरिम सरकारच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्याचे व्हेनेझुएलातील सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ५६ वर्षीय डेल्सी रॉड्रिग्ज या व्हेनेझुएलातील महत्वाच्या नेत्यांपैकी एक मानल्या जातात. निकोलस मादुरो यांच्या निष्ठावान म्हणून त्यांना ओळखले जाते. निकोलस मादुरो यांच्या मंत्रीमंडळात डेल्सी रॉड्रिग्ज या उप-राष्ट्राध्यक्ष, अर्थमंत्री आणि तेल मंत्री म्हणून कारभार पाहत होत्या.




