विज्ञानाच्या पंखांनी घेतली भरारी!महाबळेश्वरच्या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात
महाबळेश्वर: येथील अरहम विद्यालयाच्या ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जिज्ञासा आणि सर्जनशीलता विकसित व्हावी या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. संशोधन केंद्र, महाबळेश्वर येथील वैज्ञानिक सचिन सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रातील प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमांतर्गत ‘Launchpad 2026’ प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच ‘Catalyst 2026’ विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक आणि कल्पक मॉडेल्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सर्जनशीलतेचे आणि संशोधनात्मक विचारांचे सर्वांनी कौतुक केले. याचबरोबर विद्यार्थ्यांनी रंगोळी स्पर्धेद्वारे विज्ञान विषयक संदेश प्रभावीपणे मांडत विज्ञानाविषयीची जागरूकता निर्माण केली.
या विज्ञान प्रदर्शनाला पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे विशेष अभिनंदन करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, आत्मविश्वास आणि नवोन्मेषी विचारसरणी विकसित होते, असे मत व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. शैलेश पवार आणि सचिव निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांचे, मुख्याध्यापकांचे आणि शिक्षकवृंदाचे अभिनंदन करून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड अधिक वाढली असून भविष्यातील वैज्ञानिक घडवण्याच्या दिशेने हा महोत्सव प्रेरणादायी ठरला.




