आधुनिक तंत्रज्ञानाची सुविधा रयतच्या सर्व शाळांना देऊ खासदार शरदरावजी पवार
सातारा दि. “आज शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत. आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देऊ, असे मत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. खासदार शरदचंद्रजी पवार यांनी व्यक्त केले.” ते पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या १३७ व्या जयंती समारंभात बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, मा. श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, अरुण कडू पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख, सहसचिव उच्च शिक्षण विभागाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव माध्यमिक विभागाचे श्री.बी.एन.पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, कर्मवीर कुटुंबीय, प्रभाकर देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील अॅड.रवींद्र पवार व अॅड. दिलावर मुल्ला, संगीता पाटील, जे.के. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. पवार पुढे म्हणाले, एक काळ असा होता शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज हा दूर होता. पण शाहू महाराज यांच्यासारखे द्रष्टे राज्यकर्ते यांनी नेहमी भविष्यातील शिक्षणाचा विचार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा आणि सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा विचार मांडला. पुढे हाच आदर्श ठेवून उपेक्षितांच्या समाजासाठी लोकांत जागृती व अधिकाराची जाणीव निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. शाहू महाराज, ज्योतिबा फुले यांची विचारधारा स्वीकारून कर्मवीरांनी आपले अख्खे आयुष्य शैक्षणिक विकासासाठी झोकून दिले. कुंभोज, काले ही दोन ठिकाणे कर्मवीरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी हातात घेतलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे झाली आहेत, त्याचे सर्व श्रेय कर्मवीरांना द्यावे लागेल.
रयत शिक्षण संस्थेची पार्श्वभूमी व्यक्त करत असताना मा. पवार म्हणाले, समाजातील मुलामुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करण्याचे काम अण्णांनी केले. ज्यांना शिक्षण घेणे शक्य नाही अशा कुटुंबातील मुलामुलींना तुम्ही कष्ट करा, कमवा आणि घाम गाळून शिका, शैक्षणिक दृष्ट्या संपन्न व्हा या प्रकारची योजना कर्मवीरांनी सुरू केली. या विचाराला पाठिंबा देण्याच्या कार्यकर्त्यांची एक फळी तयार करायचे कामदेखील अण्णांनी केले. सुरुवातीचा काळ असा होता की, अण्णांना साथ देण्यासाठी रामभाऊ नलावडे, तात्याराव तडसरकर, आप्पासाहेब पाटील या अनेक सहकाऱ्यांनी अण्णांच्या विचाराचा स्वीकार करून अण्णांची विचारधारा पुढे नेली. अण्णांनी उत्तम नेते तयार केले. संस्था उभारण्यासाठी, संस्था चालवण्यासाठी आणि संस्थेतील कमतरता दूर करण्यासाठी समाजासाठी समाजातून मदत गोळा करण्याचे काम करणारी टीम अण्णांच्या विचाराने तयार केली. यासाठी बॅरिस्टर पी.जी.पाटील, शंकरराव काळे, अॅड.रावसाहेब शिंदे यांनी योगदान दिले. हा विचार घेऊन काम करणाऱ्या रयत सेवक व रयत प्रेमी यांच्यामुळे देशात अग्रगण्य संस्था म्हणून रयतचा नावलौकिक आहे. संस्थेचा विस्तार होऊन त्यात लाखो मुले-मुली शिक्षण घेत आहेत. या सगळ्यांच्या पाठीमागे कर्मवीरांचे विचार हा फार महत्त्वाचा ठेवा आहे असे मत व्यक्त केले.
संस्था कार्याचा आढावा घेताना संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी म्हणाले की, संस्थेमध्ये अनेक चांगले बदल केले आहेत .एक विभागीय अधिकारी व दोन सहायक विभागीय अधिकारी ही पदे निर्माण केल्याने प्रत्येक शाखेची बारकाईने काळजी घेता येते. शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचे काही प्रश्न हे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, परंतु लवकरच ते प्रश्न सुटतील. पटसंख्या हे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे, त्याला शिक्षक जबाबदार नाहीत, शैक्षणिक गुणवत्ता चांगली करण्यासाठी डिजीटायजेशन ऑफ स्कूलची गरज आहे. इमारती अपग्रेड होत असून सर्व शाळेत इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवणार आहोत. निढळ शाखा आज परिपूर्ण झाली आहे. उत्तम स्टाफ रूम, क्लास रूम व सी.सी. टी.व्ही. सुविधा आम्ही देत आहोत. सॉफ्ट स्किल, सॉफ्टवेअर इत्यादीचा उपयोग शिक्षणात वेगाने केला जात आहे, ग्रामस्थांचे सहकार्य मिळत आहे. शाळा कशी असायला हवी यासाठी आम्ही मॉडेल-स्कूल पुस्तिका तयार करत आहोत. तसेच अकाऊंट सिस्टीमध्ये सुधारणा करून सर्व शाखेचे ऑडिट त्याच शाखेत होईल यासाठी विभाग वाइज ऑडिट पॅनेल तयार करीत आहोत. इतर कोणत्याही प्रायव्हेट स्कूलपेक्षा आमची गुणवत्ता जास्त असावी हे आमचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्मवीर जयंती निमित्त साताऱ्यातील रयतच्या शाखेतील रयत सेवक व विद्यार्थी एकत्र येत कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभात फेरी सातारा शहरात काढण्यात आली तसेच समाजसुधारकांच्या पुतळ्यांना पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव विकास देशमुख यांनी केले. मान्यवरांचे हस्ते रयत विज्ञान पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेस २५ लाखपेक्षा जास्त देणगी देणारे देणगीदार शकुंतला ठाकूर, रामशेठ ठाकूर, परेश ठाकूर, शुभांगी व महेंद्र घरत, नेताजी पवार, अनिल जवळेकर, यमुना सामाजिक संस्था, मैत्री मुव्हीज, राष्ट्रवादी वेल्फेअर फंड, अशोक बोरा इत्यादींचे सत्कार करण्यात आले. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक, उत्कृष्ट मानांकन मिळविणारी महाविद्यालये, यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक, कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखा, इत्यादीचा यावेळी सन्मान करण्यात आला. पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे निवेदन संस्थेच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले, या कार्यक्रमाचे आभार संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सहसचिव श्री.बी.एन.पवार यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ.सविता मेनकुदळे यांनी केले.या कार्यक्रमास संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, विविध शाखांचे शाखाप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, शिक्षण प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.