मंत्रीपदाच्या यादीत राजधानी साताऱ्याला योग्य सन्मान हवा
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )विधानसभा निवडणुकीचा धुरळा आता खाली बसला आहे. आज मुख्यमंत्रीपदासह दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होत असताना मंत्र्यांचा शपथविधी मात्र पुढे ढकलला आहे. अशात ज्या सातारा जिल्ह्याने महायुतीला भरघोस यश मिळवून दिले त्या सातारा जिल्ह्याला त्याच तुलनेत मंत्रिपदे देण्यात यावीत, अशी मागणी नागरिकांच्या मधून होत आहे.
आज मुख्यमंत्रीपदासह दोन उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे तर ११ डिसेंबरला मंत्रिपदचा आणि तत्पूर्वी ७ व ८ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे.
२००९ ते २०१४ या कालावधीत सांगली जिल्ह्याला तीन कॅबिनेट मंत्रिपदे देण्यात आली होती. स्व.पतंगराव कदम यांना काँग्रेसकडून तर स्व. आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री अशी एकूण तीन दणदणीत खाती देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी सातारा जिल्ह्याला ना.रामराजे ना.निंबाळकर यांच्या स्वरूपात केवळ एक मंत्रिपद देण्यात आले होते.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आलेत. सध्या शिवसेनेकडून आ.शंभूराज देसाई तर भाजपकडून आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ.जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादीकडून आ.मकरंद पाटील यांचे नाव आघाडीवर आहेत. एकाच सातारा जिल्ह्यातून चार प्रबळ नावे चर्चेत आहेत. अशावेळी एकाच जिल्ह्यातून चार मंत्री करताना महायुती ज्येष्ठ नेत्यांनी सातारा जिल्ह्याला सांगली पॅटर्न वापरून काँगेस व शरद पवार राष्ट्रवादी यांच्या बालेकिल्ल्यात महायुतीचा गड अधिक भक्कम करण्याची संधी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे