मंत्री मकरंद पाटील यांची कुसगाव क्रशर प्रकरणातील भूमिका शंकास्पद? आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचा आरोप
वाई – वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघात सक्रिय असणारे मंत्री मकरंद पाटील गेली २१ दिवसांपासून आमच्या आंदोलनाला सामोरे का आले नाहीत ? त्यांचीं स्टोन क्रशर संदर्भातील भूमिका संशयास्पद आहे. कुसगाव-एकसर-व्याहळी येथील आंदोलकांनी या बाबत जहरी प्रतिक्रिया दिली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा मंत्री पाटील यांना क्रशरच्या संदर्भात गावकऱ्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली तेव्हा त्यांनी क्रशरच्या बाजूने भूमिका घेऊन गावकऱ्यांचा राग रोष कमी करण्याचा प्रयत्न केला होता. क्रशर्सना मंत्री पाटील यांचेच अभय असून जोवर क्रशर बंद होत नाही तोवर आंदोलन चालूच राहील अशी निकराची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.
वाई खंडाळा विधानसभा मतदारसंघातील शोकसभा, दशक्रिया आदी कार्यक्रमांना नामदार पाटील हजेरी लावतात. पण गेली २१ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची त्यांनी साधी दखलही घेतली नाही. उलट शासन व प्रशासनावर दबाव आणून आंदोलनात आडवं घालण्याचा प्रयत्नच केला असे आंदोलकांचा मंत्री मकरंद पाटील यांच्यावर आरोप आहे.
मागच्या जवळपास दोन वर्षांपासून कुसेगाव, एकसर, व्याहळी या परिसरातील नागरिक संबंधित दगडखाण व क्रशरच्या विरोधात सातत्याने भूमिका घेत आहेत. ग्रामस्थांची दिशाभूल करून या दगडखाणींना विविध परवानग्या मिळवून देण्यात काही मंडळी यशस्वी झाली. मात्र त्या ठिकाणी होणाऱ्या ‘ब्लास्टिंग’नंतर परिसरातील नागरिकांना त्यापासून भविष्यात होणारा त्रास लक्षात आला. तो कायमस्वरूपी बंद करण्यासाठी त्यांनी पुर्ण ताकदीने आंदोलन सुरू केले आहे.
