मंत्री मकरंद आबा पाटील यांना आमदार निवासात राहण्याची वेळ
मुंबई (शुक्रवार) : राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांना गेल्या सव्वा वर्षांपासून अधिकृत शासकीय निवासस्थानाच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. राज्यातील बहुतांश मंत्र्यांना आलिशान शासकीय बंगले उपलब्ध असताना पाटील यांना मात्र अद्याप हक्काचे निवासस्थान मिळालेले नाही.
सध्या मंत्री मकरंदआबा पाटील हे मुंबईतील ‘आकाशवाणी आमदार निवासा’तील १२० क्रमांकाच्या सदनिकेतूनच आपला प्रशासकीय कारभार सांभाळत आहेत. मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या व्यक्तीला इतका काळ अधिकृत निवासासाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
मंत्र्यांना निवासस्थान व कार्यालयांचे वाटप करण्याची जबाबदारी सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे आहे, तर इमारतींच्या दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग पार पाडते. मात्र या दोन्ही विभागांकडून समन्वयाच्या अभावामुळे पाटील यांना निवासस्थान उपलब्ध करून देण्यात विलंब होत असल्याची टीका होत आहे.
पाटील यांना मंजूर करण्यात आलेली ‘सुरूची’ इमारतीतील सदनिका अद्याप दुरुस्तीच्या फेऱ्यात अडकलेली आहे. संबंधित कंत्राटदाराचे बिल थकल्यामुळे काम रखडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, एका मंत्र्यालाच इतका कालावधी प्रतीक्षा करावी लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, ही बाब लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी होत आहे.




