मराठ्यांचा इतिहास हा असीम धैर्याचा,पराक्रमाचा व त्यागाचा- प्रा विक्रम कदम
सातारा प्रतिनिधी –छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली.छत्रपती संभाजी महाराजांनी त्या स्वराज्याचं शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण केलं.संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी औरंगजेबासोबत केलेला संघर्ष हा असामान्य असून स्वराज्य जिंकण्यासाठी आलेला औरंगजेब मराठ्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर याच मातीत गाढला.मराठ्यांचा इतिहास असीम धैर्याचा पराक्रमाचा व त्यागाचा आहे.असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक प्रा विक्रम कदम यांनी केले.
छत्रपती संभाजी महाराज स्मृती विचार मंच कुमठे,ता कोरेगाव, आयोजित कुमठे येथील छत्रपती संभाजीराजे बलिदान दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निलेश पोरे,गोळेवाडीचे माजी सरपंच सतीश गोळे,सतीश माने,रुपेश सपकाळ,विक्रम फडतरे,सोमनाथ बर्गे, आनंदराव बर्गे यांची उपस्थिती होती प्रा.कदम सर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबाला वाटलं की हा महाराष्ट्र आपण सहज गिळून टाकू परंतु छत्रपती राजाराम महाराज व त्यांच्या पश्चात महाराणी ताराराणी साहेब यांच्या नेतृत्वात संताजी घोरपडे धनाजी जाधव इत्यादी सरदारांनी असामान्य शौर्य गाजवलं आणि शत्रूला सोडून सोडलं अफाट फौज व प्रचंड खजाना घेऊन आलेला औरंगजेब जवळपास 27 वर्ष मराठ्यांशी लढत राहिला.शेवटी तो इथंच महाराष्ट्राच्या मातीत गाढला गेला.त्याला त्याची राजधानी सुद्धा बघायला मिळाली नाही.सर्वसामान्य रयतेने बलाढ्य अशा शत्रूसोबत दिलेला लढा केवळ असामान्य असून जगात अशाप्रकारे उदाहरण पहावयास मिळणार नाही. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतापसिंह विक्रम कदम या बालवक्त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरचा पोवाडा सादर केला.त्यानंतर श्लोक निलेश पोरे,शिवराज भोसले व श्रेया योगेश पोरे या बाल वक्त्यांची भाषणेही झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जोतिरामतात्या वाघ यांनी केले. याकार्यक्रमासाठी कुमठे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लोक आवर्जून उपस्थित होते.छत्रपती संभाजी महाराज स्मृती विचार मंच च्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
