भोले बाबांच्या सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना; सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यूचा आकडा पोचला 107 वर!
हाथरस : भोले बाबांच्या सत्संगादरम्यान मोठी दुर्घटना घडलीये. सत्संगाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत 107 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. मृतांमध्ये बहुतांश महिलांचा समावेश आहे.
या दुर्घटनेत शंभरहून अधिक लोक गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची दखल घेतली आहे. सीएम योगी यांनी मृतांबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना ताबडतोब रुग्णालयात नेऊन त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिलेत. एडीजी आणि आयुक्त यांना घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्य सचिव मनोज कुमार सिंह आणि डीजीपी प्रशांत कुमार हाथरसला रवाना झाले आहेत.
भोले बाबाचा प्रवचनाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी
हाथरस येथील सिकंदरराव कोतवाली भागातील फुलराई गावात भोले बाबाचा प्रवचनाचा कार्यक्रम सुरू होता. अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. एका अंदाजानुसार 1.25 लाख लोक या सत्संगसाठी आले होते. गर्दीमुळे लोकांचे हाल होऊ लागले. उन्हामुळे लोक बेशुद्ध झाले आणि नंतर चेंगराचेंगरी झाली. लोक जमिनीवर पडले तेव्हा इतर लोक त्यांना चिरडून बाहेर येऊ लागले. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी शेकडो गंभीर लोकांना रुग्णालयात दाखल केलंय.
सर्वत्र दिसत आहेत मृतदेह
हाथरसमधील परिस्थिती अजूनही नियंत्रणात नाही. सर्वत्र मृतदेह दिसत आहेत. मृतदेहांची मोजणी करणेही कठीण झाले आहे. जखमी लोकही सातत्याने रुग्णालयात दाखल केले जात आहेत. रुग्णवाहिकांची गर्दी दिसतेय. जवळपासच्या जिल्ह्यातील डॉक्टरांनाही येथे पाचारण करण्यात आले आहे. औषध आणि ग्लुकोजचा साठा मागवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हातरस चेंगराचेंगरीतील मृतांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. 24 तासांत चौकशी अहवाल मागवला आहे. कार्यक्रम आयोजकांवर एफआयआर दाखल करून मोठी कारवाई करण्याच्या तयारीत प्रशासन आहे.
