- महाराष्ट्रात बनावट पनीरवर FDA ची कारवाई; एक वर्षासाठी विक्री व वितरणावर बंदी

- मुंबई : ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर बनावट (अनालॉग/नॉन-डेअरी) पनीरच्या उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर एक वर्षासाठी बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दुधापासून तयार होणाऱ्या खऱ्या पनीरऐवजी वनस्पतीजन्य तेल, स्टार्च व इतर घटकांचा वापर करून तयार केलेले पनीर ग्राहकांना खऱ्या पनीरच्या नावाखाली विकले जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
- FDA ने अलीकडील तपासणीत अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे व दिशाभूल करणारे पनीर आढळून आल्याचे सांगितले. अशा प्रकारचे उत्पादन ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण करू शकते. त्यामुळे राज्यभर अन्नसुरक्षा नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असून उत्पादक, घाऊक विक्रेते आणि किरकोळ विक्रेत्यांवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
- प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, खऱ्या दुधाच्या पनीरप्रमाणे बनावट पनीरची विक्री करणे कायद्याचे उल्लंघन आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. दोषी आढळल्यास दंडासह कारावासाचीही तरतूद आहे.
- ग्राहकांनी पनीर खरेदी करताना त्यावरील लेबल, उत्पादकाची माहिती, घटकांची यादी आणि उत्पादनाची गुणवत्ता तपासावी, असे आवाहन FDA ने केले आहे. संशयास्पद किंवा निकृष्ट दर्जाचे पनीर आढळल्यास जवळच्या अन्न सुरक्षा कार्यालयात तक्रार करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
- या निर्णयामुळे बाजारातील भेसळयुक्त अन्नपदार्थांवर आळा बसण्यास मदत होईल, तसेच ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.




