महामार्गावरील खंडाळा हद्दीतील अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग हा देशातील महत्त्वाचा व अतिव्यस्त मार्ग आहे. या मार्गावरील खंडाळा परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून हॉटेल व्यवसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारी वारंवार होत होत्या. या अतिक्रमणामुळे महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना जागा कमी मिळत होती, अपघातांचा धोका वाढत होता तसेच वाहतूक कोंडी निर्माण होत होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व स्थानिक प्रशासनाने संयुक्त कारवाई करत आज मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटवले. सकाळपासूनच महसूल विभाग, पोलिस विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेसीबी, पोकलेन, क्रेन यांच्या साहाय्याने हॉटेलसमोरील बेकायदेशीर शेड, शेडींग्ज, पार्किंगसाठी बांधलेले कॉंक्रिट स्ट्रक्चर तसेच होर्डिंग्ज काढण्यात आले.
या कारवाईत सुमारे १४ हॉटेल्स व अनेक जाहिरात फलकांवर हातोडा चालवण्यात आला. काही व्यावसायिकांनी स्वेच्छेने अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केला तर काही ठिकाणी प्रशासनाला पोलिस बंदोबस्तात तोडफोड करावी लागली.
अतिक्रमण हटविल्यानंतर महामार्गावरील जागा मोकळी झाल्यामुळे वाहतूक सुलभ झाली असून अपघातांचा धोका कमी होणार आहे. प्रशासनाने या कारवाईनंतर स्पष्ट केले की,महामार्गावरील सुरक्षितता धोक्यात आणणारे कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही.
भविष्यात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले असून वाहनचालकांनीही प्रशासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले.
