महादरे–हत्ती तलावांचा सर्वांगीण विकास; ६ कोटींच्या प्रकल्पाला वेग
सातारा प्रतिनिधी -शहराच्या उपनगरातील महादरे आणि हत्ती तलाव परिसराचा विकास करण्यासाठी सुमारे ६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला आता गती मिळत आहे.
श्रीमंत छत्रपती ना.शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह स्थळ पाहणी करून कामाचा आढावा घेतला. या वेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष अॅड. दत्ता बनकर, पाणीपुरवठा सभापती धनंजय जांभळे, भाजप गटनेते अविनाश कदम, नियोजन सभापती अशोक शेडगे, नगरसेविका सौ. मुक्ता लेवे तसेच मुख्याधिकारी विनोद जळक चीद्रे साहेब विनोद दहिफळे उपस्थित होते.
या प्रकल्पांतर्गत तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवणे, परिसराचे सुशोभीकरण करणे आणि संपूर्ण भाग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करणे यावर भर देण्यात येणार आहे. नगरपालिका मालकीच्या सुमारे २८ एकर जागेत आकर्षक बाग विकसित करण्याची संकल्पनाही पुढे आली आहे. हा प्रकल्प तीन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात तलावांचे सौंदर्यीकरण, दोन्ही तलावांना जोडणाऱ्या जुन्या संरचनेची दुरुस्ती व मजबुतीकरण, पाणी शुद्धीकरण यंत्रणा अद्ययावत करणे आणि परिसरातील रस्ते व दळणवळण सुविधा सुधारण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. प्रस्तावित रिंग रोडमुळे कास पठाराकडून येणाऱ्या पर्यटकांना या भागात सहज प्रवेश मिळेल. याचबरोबर जवळील फुलपाखरू अभयारण्यालाही या विकासाचा लाभ होण्याची अपेक्षा आहे.
नागरिकांसाठी विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून मोठी बाग उभारली जाणार असून, त्यात बसण्यासाठी बाके, पॅगोडा, ‘नाना-नानी पार्क’ यांसारख्या सुविधांचा समावेश असेल. तसेच पर्यावरणपूरक उपक्रम आणि वृक्षारोपणासाठी नगरपालिका व वनविभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून नियोजन करण्यात येणार आहे.




