महाबळेश्वरच्या विविध समस्यांवर शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; 15 दिवसांत निराकरणाचे आश्वासन
महाबळेश्वर: महाबळेश्वर शिवसेना शहर शाखेच्या वतीने महाबळेश्वर नगर परिषदेचे प्रशासकीय मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांना शहराच्या विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना शहर पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्याधिकाऱ्यांनी सर्व समस्या ऐकून घेतल्या आणि येत्या पंधरा दिवसांत यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी पाटील यांच्याकडे हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी नगरपालिकेमार्फत लवकरात लवकर पाठपुरावा करून शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्याची विनंती केली. यासाठी लागणारी सर्व मदत करण्याचे आश्वासनही शिवसेनेने दिले.
शहरातील कचरा समस्येवरही यावेळी सखोल चर्चा झाली. शहरात मोठ्या प्रमाणात पडलेला कचरा उचलण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी आणि महाबळेश्वरवासीयांना दुर्गंधीयुक्त कचऱ्यापासून सुटका मिळावी अशी मागणी करण्यात आली.
सातारा रोडवरील विद्युत खांबांची चुकीची मांडणी हा देखील चर्चेचा एक महत्त्वाचा मुद्दा होता. हे खांब अक्षरशः नाल्यांमध्ये उभे केल्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होतो, असे निदर्शनास आणून देण्यात आले. तसेच, या नाल्यांमध्ये केबल टाकून त्यावर मोठ्या प्रमाणात काँक्रीट टाकल्यामुळे नाले बुजल्याची गंभीर बाबही त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली आणि यावर जातीने लक्ष घालण्याची विनंती केली.
महाबळेश्वर नगरपालिकेच्या अगदी जवळ असलेल्या हॉटेल ‘बाईक’ येथे शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर खोल्या बांधण्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. या बांधकामांना कोणत्या परवानग्या आहेत याची चौकशी करून हॉटेलवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली.
या चर्चेत महाबळेश्वर शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू, महाबळेश्वर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक सतीश ओंबळे, शहर संघटक सुनील ढेबे, अल्पसंख्यांक शहर संघटक उस्मान खारखंडे, तालुका शिवसेना वैद्यकीय राजू पंडित, सचिन ओतारी, किरण मोरे, वाई महिला संपर्क वर्षा आरडे, तालुका महिला मेघा चोरगे, शिवसेना महिला शहर सुनीता फळणे, महिला शाखा मंगल फळणे, प्रभा नायडू, महिला शाखा शितल औतारी, महिला विभाग सोनाली बांधल आणि इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांना कामासंदर्भात सूचना दिल्या. येत्या पंधरा दिवसांत महाबळेश्वर शहराच्या सर्व समस्यांचे निराकरण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी शिवसेना शहर प्रमुख विजय नायडू यांनी सांगितले की, यापुढे सर्व शिवसेना पदाधिकारी एकजुटीने महाबळेश्वर शहराच्या विकासाच्या संदर्भात नागरिकांच्या काही अडीअडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
