महाबळेश्वर येथे वन्यजीव सप्ताह सांगता समारंभ उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी
वन्यजीव संरक्षणाबाबत जनतेमध्ये जनजागृती
महाबळेश्वर : १ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत साजऱ्या करण्यात आलेल्या वन्यजीव सप्ताहाचा सांगता समारंभ महाबळेश्वर येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे आयोजन मा.गणेश सातपुते, उपवनसंरक्षक सातारा व मा. प्रदीप रोंधळ, सहाय्यक वनसंरक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सांगता समारंभानिमित्त शेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने महाबळेश्वर बाजारपेठेतून वन्यजीव संरक्षणाविषयी जनजागृती फेरी काढली. विद्यार्थ्यांनी “वन्यजीव वाचवा – पर्यावरण जपा”, “निसर्ग आपली संपत्ती आहे” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये जागृती निर्माण केली.
कार्यक्रमाच्या सांगता समारंभात वनपरिक्षेत्र अधिकारी मा.महादेव मोहिते यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले. कार्यक्रमाचे नियोजन वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी केले होते.यावेळी वनपरिमंडळ अधिकारी सहदेव भिसे, करुणा जाधव, काकडे तसेच सर्व वनरक्षक उपस्थित होते.वन्यजीवांचे संरक्षण हे पर्यावरण संतुलनासाठी अत्यावश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून समाजापर्यंत पोहोचविण्यात आला.
