महाबळेश्वर तालुक्यातील मोबाईल टॉवर – असुनही सेवा अपुरी; वीज कनेक्शनअभावी नागरिक त्रस्त
प्रतापगड प्रतिनिधी-महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागात मोबाईल टॉवर उभारले असले तरी, वीज कनेक्शन नसल्याने आणि फक्त सौर ऊर्जेवर अवलंबून असल्याने सेवा मोठ्या प्रमाणावर खंडित होत आहे. यामुळे स्थानिकांना संवाद साधणे, तातडीच्या परिस्थितीत मदत मागवणे आणि डिजिटल सुविधा वापरणे अशक्य होत आहे.
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुलदिप शिवराम यादव यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, “आमच्या भागात पावसाळ्यात सलग ३ महिने सूर्याचे दर्शन होत नाही, हे नवीन नाही. सोलरवर चालणारे टॉवर या काळात बंद पडतात आणि नागरिक पूर्णपणे संपर्कविहीन होतात. या समस्येवर MSCB आणि बीएसएनएल यांनी तातडीने समन्वय साधून वीज कनेक्शन द्यावे.”
डॉ. यादव यांनी पुढे सांगितले की, “या भागात प्रायव्हेट कंपन्या सेवा देऊ शकत नाहीत. बीएसएनएल हा एकमेव पर्याय असून, तोही अपूर्ण अवस्थेत आहे. आम्ही १५ वर्षे सतत प्रयत्न करून विकासात्मक सुविधा मिळवल्या, पण आजही त्या पूर्ण क्षमतेने वापरता येत नाहीत. हा नागरिकांच्या हक्कांचा प्रश्न आहे.”
स्थानिक नागरिकांनीही यावर तातडीची कारवाई करण्याची मागणी केली आहे. विशेषत: आपत्कालीन परिस्थितीत मोबाईल नेटवर्क नसल्याने आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि शिक्षण या सर्वच क्षेत्रांवर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, संबंधित विभागांनी अद्याप याबाबत ठोस भूमिका घेतलेली नसून, वीज कनेक्शनच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी स्थानिक प्रशासन, बीएसएनएल आणि MSCB यांच्यातील समन्वय हा आता काळाची गरज ठरली आहे.





