महाबळेश्वर नगरपालिकेकडून सफाईमित्रांसाठी प्रशिक्षण आणि सुरक्षा उपकरणे वाटप
महाबळेश्वर: स्वच्छ सर्वेक्षण २०२४ आणि माझी वसुंधरा ५.० अंतर्गत महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेने शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी (सफाई मित्र) आरोग्य आणि सुरक्षिततेचे प्रशिक्षण आयोजित केले होते. तसेच त्यांना सुरक्षा उपकरणे आणि ओळखपत्रे यांचे वाटप करण्यात आले.
महाबळेश्वर नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांच्या संकल्पनेतून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. डॉ. पंकज दास आणि अमित चव्हाण या तज्ज्ञांनी सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.
प्रशिक्षणात सफाई कर्मचाऱ्यांना काम करताना स्वतःची काळजी कशी घ्यावी, आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच, सुरक्षा उपकरणांचा योग्य वापर कसा करावा, याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे, पाण्याच्या बाटल्या आणि टोप्यांचे वाटप करण्यात आले. मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, “शहराला स्वच्छ ठेवण्यात सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यामुळेच महाबळेश्वर स्वच्छ आणि सुंदर दिसते.
या प्रशिक्षणाचा सफाई कर्मचाऱ्यांना नक्कीच उपयोग होईल. तसेच, त्यांनी काम करताना सुरक्षा उपकरणांचा वापर करावा, जेणेकरून त्यांचे आरोग्य चांगले राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ९० हून अधिक सफाई कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेचे मुकादम मनोज चव्हाण, आयुब वारुणकर, व्ही.डी.के. चे सुपरवाजर मथन मोहोते, आकाश लोहार, स्वच्छ भारत समन्वयक वैभव साळुंखे, हिलदारीचे राम भोसले व सर्व टीम यांनी परिश्रम घेतले.
