सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महाबळेश्वर नगरपरिषदेचा पुढाकार; मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे राज्य सफाई कर्मचारी आयोगाकडून कौतुक
महाबळेश्वर:सफाई कर्मचाऱ्यांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत संवेदनशीलतेने काम करणारे महाबळेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्याची राज्य स्तरावर विशेष दखल घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मा. श्री. शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी नुकत्याच झालेल्या सातारा दौऱ्यादरम्यान महाबळेश्वर नगरपरिषदेच्या आढावा बैठकीत मुख्याधिकारी पाटील यांच्या धोरणात्मक निर्णयांचे आणि तत्परतेचे कौतुक करत त्यांचे विशेष अभिनंदन केले.
कल्याणकारी उपक्रम आणि महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णय
▪️लाड-पागे समितीच्या शिफारशींची वेगात अंमलबजावणी:
लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार ऑगस्ट २०२४ पासून ते आजअखेर ११ कर्मचाऱ्यांना यशस्वीरीत्या नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तसेच उर्वरित ५ प्रलंबित प्रकरणांमध्ये नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर लाभ दिला जाईल, अशी ग्वाही मुख्याधिकाऱ्यांनी दिली.
▪️अवघ्या २४ तासांत नियुक्तीपत्र:
सेवानिवृत्त सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रशासकीय लालफितीत अडकवून न ठेवता अवघ्या २४ तासांच्या आत नियुक्तीपत्र देऊन मुख्याधिकाऱ्यांनी संवेदनशील प्रशासनाचा वस्तुपाठ घालून दिला आहे.
▪️’मेडिक्लेम’ व आरोग्य तपासणी सुविधा
शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य देत, सर्व सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘मेडिक्लेम योजना’ लागू करण्यात आली आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांसाठी नियमित मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
“सफाई कर्मचारी हे शहराच्या आरोग्याची खरी ढाल आहेत. त्यांच्या न्याय्य हक्कांचे रक्षण करणे, आरोग्य जपणे आणि त्यांना सेवाविषयक लाभ वेळेत देणे यास प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.”
— श्री. योगेश बाळकृष्ण पाटील* (मुख्याधिकारी, महाबळेश्वर नगरपरिषद)
सफाई कर्मचारी संघटनेकडून विशेष आभार
महाबळेश्वर गिरिसंस्थान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय तत्परतेने घेतल्याबद्दल महाबळेश्वर गिरिसंस्थान नगरपरिषद सफाई कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि कर्तव्यदक्ष नेतृत्वामुळे मुख्याधिकारी योगेश पाटील यांचा राज्य स्तरावर झालेला गौरव महाबळेश्वर शहरासाठी अभिमानास्पद ठरला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.





