महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिकाचा जागीच मृत्यू
महाबळेश्वर : महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणाऱ्या एसटी बस आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची समोरासमोर धडक होऊन हा अपघात घडला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वरपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर माचूतर गावाच्या हद्दीत शनिवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. महाबळेश्वरहून साताऱ्याकडे जाणारी राजमाता जिजाऊ एसटी बस (एमएच १४ एनई ४२२५) आणि महाबळेश्वरच्या दिशेने येणारी दुचाकी (एमएच ११ एव्ही २०८८) यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
या अपघातात नरेश रमेश भोंडेकर (वय ४५, रा. टेकवली, ता. महाबळेश्वर) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला.अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि एसटी बसच्या वाहकाने तत्काळ धाव घेत गंभीर जखमी अवस्थेतील नरेश भोंडेकर यांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
मृत नरेश भोंडेकर हे महाबळेश्वर एसटी बसस्थानकाच्या मागील बाजूस, हॉटेल ड्रीमलँडसमोरील गाळ्यात मोबाईल रिपेअरिंगचे दुकान चालवत होते. नेहमीप्रमाणे ते आपल्या दुकानाकडे येत असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याची माहिती मिळाली.घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, महात्मा गांधी रोड परिसरातील गाळाधारक तसेच व्यापाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नरेश भोंडेकर हे अत्यंत साध्या कुटुंबातील असून त्यांच्या पश्चात पत्नी, अवघी आठ महिन्यांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे टेकवली गावासह महाबळेश्वर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षद गालिंदे यांच्या मार्गदर्शन खाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे व पोलिस हवालदार संतोष शेलार करत आहे.





