स्वर्गीय आशिष भोसले शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरेल- श्रीरंग काटेकर.
गौरीशंकर डी. फार्मसी लिंब मधील गुणवंत विद्यार्थिनी रसिका मतकर हिला शिष्यवृत्ती प्रदान.
बावधनचे भोसले कुटुंब यांचे दातृत्व..
लिंब: गुणवंत व प्रतिभासंपन्न विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा देण्यासाठी व शैक्षणिक काळात त्यांना आर्थिक मदतीचा हातभार लावण्यासाठी स्वर्गीय आशिष शिवाजीराव भोसले यांच्या नावाने देण्यात येणारी शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या उत्कर्षाला पूरक ठरेल असे मत गौरीशंकरचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर यांनी व्यक्त केले आहे ते लिंब ता. जि. सातारा येथील गौरीशंकर डी. फार्मसी लिंब महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थिनी रसिका धनसिंग मतकर हिला शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र प्रदान प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी
ॲड. संभाजीराव भोसले, प्राचार्य विजय राजे, प्रा. शुभम चव्हाण, प्रा. स्वाती पवार, प्रा. उज्वला बाल्टे, प्रा. शिवानी पोळ आदी प्रमुख उपस्थित होते. संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर पुढे म्हणाले की, स्वर्गीय आशिष भोसले हा गुणवंत विद्यार्थी होता. पाचवड येथे रस्ते अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला सर्वांशी स्नेहपूर्ण संबंध ठेवणाऱ्या आशिषच्या अकाली निधनाचा सर्वांनाच मोठा धक्का बसला. आशिषची चिरंतर आठवणींना उजाळा मिळावा म्हणून भोसले कुटुंबीयांनी गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी संस्थेकडे रक्कम स्वरूपात ठेव ठेवली. त्या रकमेतील व्याजातून दरवर्षी गुणवंत गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विजय राजे म्हणाले की स्वर्गीय आशिष भोसले यांच्या कुटुंबीयांनी गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणी येऊ नये म्हणून शिष्यवृत्ती देण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप मोलाचा आहे. भोसले कुटुंबीयांचे संस्थेवर असलेले विशेष प्रेम व जिव्हाळा यामधून दिसून येत आहे कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते…
वाई (बावधन) च्या शिवाजीराव भोसले व त्यांच्या कुटुंबावरील संकट काळात गौरीशंकर परिवार ठामपणे उभा राहिला. स्वर्गीय आशिषने अल्पावधीत शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. सर्वांची मने जिंकणारा व सर्वांना हवाहवासा वाटणारा आशिष हा एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्याच्या अकाली मृत्यूने सर्वांच्याच मनाला वेदना झाल्या भोसले. कुटुंबियांनी गौरीशंकर संस्थेची नाळ मात्र कायमच ठेवली. गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत त्याच्या रूपातून देताना त्यांनी दाखवलेले दातृत्व खूप मोलाचे ठरते.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. स्वाती पवार यांनी केले. आभार प्रा.शिवानी पोळ यांनी केले.
