आरटीई प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त! 18 डिसेंबरपासून शाळा नोंदणीला होणार सुरुवात; यंदा जून-जुलैपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणार
प्रतिनिधी -पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची कवाडे उघडणार्या आरटीई प्रवेश प्रक्रियेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी 18 डिसेंबरला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार असून, जानेवारी महिन्यात विद्यार्थी नोंदणीला सुरुवात होईल.तर, मार्च महिन्यात प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होईल. यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकार्यांनी दिली आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विशेषकरून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये 25 टक्के आरक्षित जागांसाठी आरक्षित प्रवर्ग तसेच आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. संबंधित प्रवेश प्रक्रिया दरवर्षी उशिरा सुरू होते. त्यातच ऑनलाइन यंत्रणेतील दोष, शासनाकडून मान्यता देण्यास होणारी दिरंगाई अशा विविध कारणांमुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया रखडते. त्यामुळे एकीकडे डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असली, तरी आरटीई प्रवेश प्रक्रियेला मात्र मुहूर्त लागत नव्हता. अखेर यंदा संबंधित प्रवेश प्रक्रिया डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार आहे.2024-25 मधील शैक्षणिक वर्षांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया प्रथम चुकीच्या निर्णयामुळे, त्यानंतर कोर्ट कचेरी आणि पुनर्प्रक्रियेमुळे लांबली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे किमान यंदा तरी आरटीई प्रवेश प्रक्रिया वेळेत सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती.