पुसेगाव परिमंडळात बिबट्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती
पुसेगाव : मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी पुसेगाव वनपरिमंडळातील ३६ गावांमध्ये वन विभागाच्या वतीने बिबट्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ग्रामस्थांच्या सोयीनुसार बैठका घेऊन बिबट्याचा वावर, घ्यावयाची काळजी आणि वन्यजीवांसोबत सहजीवन याबाबत माहिती दिली जात आहे.
शेतात काम करणाऱ्या महिला, ग्रामस्थ तसेच जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना बिबट्याबाबत आवश्यक खबरदारीची माहिती देण्यात येत आहे. तसेच वाड्या-वस्त्यांवर जाऊन प्रत्यक्ष जनजागृती केली जात आहे. भित्तीपत्रके, सोशल मीडिया आणि माहितीपटांच्या माध्यमातूनही मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे.
पुसेगाव परिमंडळात पशुहानीच्या घटना घडल्यास वन विभागाकडून तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याची कार्यवाही केली जात आहे. ग्रामस्थ आणि वन विभाग यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास मानव-वन्यजीव संघर्ष निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला.
वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन आटपाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राजाराम काशीद, वनरक्षक सोनकांबळे, काळे, माने तसेच वनसेवक मदने, जगताप, जाधव आदी कर्मचारी जनजागृती मोहिमेत सक्रियपणे काम करत आहेत.





