लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; बोंडारवाडी धरण पूर्ण करण्याची ग्वाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मेढा प्रतिनिधी -राज्यातील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना लाभ मिळावा लाडकी बहीण योजना मी मुख्यमंत्री असताना सुरू केली. त्यामुळे लाडक्या बहिणींचा आशीर्वाद नेहमीच शिवसेनेच्या पाठीशी राहिला असून विरोधकांनी कितीही टीका टिप्पणी केली तरी लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. नैसर्गिक दृष्ट्या संपन्न असलेल्या मेढा,केळघर विभागातील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून केळघर विभागातील महत्वाचे असलेले बोंडारवाडी धरण पूर्ण करण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणार अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जावळी तालुक्यातील कुसुंबी गटातील शिवसेनेच्या उमेदवार कविता ओंबळे, कुसुंबी ,गणातील उमेदवार सुनीता दुंदळे व आंबेघर गणातील उमेदवार आतिष कदम , यांच्या प्रचारार्थ आज केळघर येथे आयोजित प्रचार सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
यावेळी माजी आमदार दगडू दादा सपकाळ, नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम, सह संपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे , कराड चे नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव,संपर्क प्रमुख शरद कणसे, रेश्मा जगताप, रणजित सिंह भोसले, माजी सभापती बापूराव पार्टे, आरपीआय चे अध्यक्ष संजय गाडे, चंद्रकांत जाधव,साहिल शिंदे, शांताराम कदम, समीर गोळे, आनंदराव जुनघरे,अशोक संकपाळ,यांच्यासह तालुक्यातील शिवसेना, राष्ट्रवादी ,आरपीआय चे पदाधिकारी ,कार्यकर्ते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, जावळी ही माझी जन्मभूमी आहे. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले जावळीचे खोरे असून या भागात पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोकणाला व पश्चिम महाराष्ट्र ला जोडणाऱ्या पुलाचे काम प्रगती पथावर आहे. नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून युवकांना रोजगारासाठी मुंबई, ठाणे, पुणे या शहरांची वाट धरावी लागणार नाही. मुख्यमंत्री असताना सामान्य लोकांसाठी काम केले असून घरात बसून काम न करता जनतेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काम केले आहे. याची जाणीव राज्यातील जनतेला आहे .जावळी तालुक्यातील विकासकामांसाठी राज्य सरकार च्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. विरोधकांच्या टीका टिप्पणी ला एकनाथ शिंदे कामातून उत्तर देत असतो. त्यामुळे विरोधकांच्या टिकेला मी फारसे महत्व देत नाही. केळघर परिसरातील जनतेसाठी बोंडारवाडी धरण महत्वाचे असून या धरणाचे काम शिवसेनाच करणार अशी ग्वाही देऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना व मित्रपक्षांच्या उमेदवारांना मोठया मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन त्यानी जनतेला केले.
माजी आमदार दगडू सपकाळ म्हणाले, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने काम करत असून जावळी महाबळेश्वर या स्थानिक भूमीपुत्राला ताकद देण्यासाठी या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन केले.
एकनाथ ओंबळे म्हणाले, हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाचा प्रश्न राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गी लावला असून यासाठी १५कोटी निधी उपलब्ध करून दिला असून मेढा ,केळघर विभागातील विकासकामांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी उपलब्ध करून दिला असून बोंडारवाडी धरणाचा प्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे निश्चित सोडवतील अशी खात्री आहे.यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.




