किसनवीर कारखान्याला गतवैभव मिळवून देण्याचा खासदार नितीन पाटील यांचा निर्धार
भुईंज -(मधुकर खरे)किसनवीर सातारा सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा किसनवीर कार्यस्थळावर खेळीमेळीत संपन्न झाली. या सभेला हजारो सभासद, संचालक, तसेच जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित होते. कारखान्याचे चेअरमन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची मंत्रालयात महत्त्वाची कॅबिनेट बैठक असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत.
या सभेची संपूर्ण धुरा खासदार नितीनकाका पाटील यांनी सांभाळली. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाने उपस्थित सभासदांना विश्वास वाटला की किसनवीर कारखाना पुन्हा एकदा गतवैभव मिळवणार आहे.
खासदार नितीन पाटील म्हणाले की,मागील व्यवस्थापनाने बेसुमार कर्ज व देणी करून कारखाना डबघाईस आणला होता.मात्र केंद्र सरकारच्या मदतीने ४६५ कोटी रुपये मिळवून कारखाना वाचवण्यात आला. यावेळी खासदार नितीनकाका पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेही विशेष आभार मानले.
कारखान्यावरील ६०० कोटींच्या कर्जापैकी ३५० कोटी रुपयांचे वन टाईम सेटलमेंट करण्यात आले असून १५० कोटींची बचत केली कामगारांच्या प्रोविडेंट फंडापासून ते केंद्र-राज्य सरकारचे सर्व टॅक्स भरण्यात आले.विशेष म्हणजे, कारखान्याचा कारभार हाती घेतल्यापासून एक पैसाही कर्ज कोणत्याही बँकेकडून घेतले गेले नाही. उलट जवळपास निम्म्या थकीत देण्या भागवण्यात यश आले.
नितीन पाटील यांनी सभासदांना आवाहन केले की,
“तुम्ही किसनवीरला ऊस घाला… मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला सर्वोच्च दरासह साखरही मिळेल. कामगारांचे पगार वेळेवर दिले जातील.”
सभेत व्हाइस चेअरमन प्रमोददादा शिंदे यांनीही आपल्या जोशपूर्ण भाषणातून कारखान्याच्या भविष्यासंदर्भात आश्वस्त केले. दोन्ही नेत्यांनी सभासदांच्या सर्व प्रश्नांना थेट उत्तरे देत त्यांचा विश्वास जिंकला.
मंत्री मकरंदआबा पाटील , खासदार नितीन काका पाटील आणि प्रमोद दादा शिंदे – हे तिन्ही नेते किसनवीर कारखाना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटत आहेत. पैशाचा काटेकोर विचार करून कारखाना चालवला जात असून, सभासद व कामगारांचा विश्वास टिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
