केट्स पॉईंटवर थरारक शोधमोहीम; ३५० फूट खोल दरीतून सापडला पाटणच्या (ढेबेवाडी) युवकाचा मृतदेह
महाबळेश्वर -सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांची धाडसी शोधमोहीम यशस्वी
महाबळेश्वर प्रतिनिधी :महाबळेश्वर तालुक्यातील वकाळी येथील प्रसिद्ध केट्स पॉईंट परिसरात घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथून बेपत्ता झालेल्या १७ वर्षीय भगवतसिंह मदनसिंह सोळंकी या युवकाचा मृतदेह सुमारे ३५० फूट खोल दरीत आढळून आला. अत्यंत दुर्गम आणि धोकादायक अशा परिसरात ही शोध व बचाव मोहीम सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर या स्वयंसेवी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
२५ जानेवारी रोजी दुपारी ढेबेवाडी पोलीस ठाण्याकडून सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांच्याशी संपर्क साधण्यात आला होता. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथील १७ वर्षीय युवक बेपत्ता झाल्याची तक्रार असून त्याचा मोबाईल लोकेशन केट्स पॉईंट व अवकाळी परिसरात दाखवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. यापूर्वी पोलीस, ग्रामस्थ तसेच नातेवाईकांकडून दिवसभर शोध घेण्यात आला; मात्र युवकाचा ठावठिकाणा लागला नव्हता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वर यांच्याकडे मदतीची विनंती करण्यात आली. पथक तत्काळ शोधमोहीमेसाठी सज्ज झाले होते. मात्र नातेवाईकांकडून आवश्यक माहिती संकलन, वाहतूक कोंडी तसेच रात्रीच्या वेळी जंगल व खोल दरीत शोध घेण्याचा धोका लक्षात घेता पहिल्या दिवशी मोहीम तात्पुरती स्थगित करण्यात आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सह्याद्री ट्रेकर्स महाबळेश्वरच्या अनुभवी सदस्यांनी अत्यंत कठीण आणि जोखमीच्या परिस्थितीत दोरखंडाच्या सहाय्याने सुमारे ३५० फूट खोल दरीत उतरून शोध घेतला. अखेर युवकाचा मृतदेह दरीत आढळून आला. मोठ्या शिताफीने मृतदेह बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.



