कासचा हंगाम १ सप्टेंबर पासून प्रारंभ-उपवन संरक्षक अमोल सातपुते
सातारा : आपल्या बहारदार पुष्प पठारामुळे जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठारावरील फुलांची उगवन होऊ लागली आहे. यामुळे कास पठारावरील फुलांचा यंदाचा हंगाम १ सप्टेंबर पासून सुरू करण्यात येणार आहे. हंगामाच्या दृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पर्यटकांसाठी विविध सुविधा करण्यात येणार असून ऑफलाईन पर्यटकांसाठी दुप्पट शुल्क आकारण्याबाबत निर्णय घेण्यात आला असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
कास हंगामा बाबत उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या उपस्थितीत कास पठार व्यवस्थापन करणाऱ्या सहा गावातील सदस्य व ग्रामस्थांची बैठक सातारा येथील वनभवनामध्ये झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीला सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ, सातारा वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे, जावली वनपरिक्षेत्र अधिकारी अर्जुन गमरे, वनपाल उज्वला थोरात, राजाराम काशीद, वनरक्षक समाधान वाघमोडे, प्रकाश शिंदे, दत्तात्रय हेर्ले कर, दत्तात्रय किर्दत, प्रदीप कदम, विकास किर्तन, सोमनाथ जाधव, विठ्ठल कदम, मारुती चिकणे, ज्ञानेश्वर आखाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी अमोल सातपुते म्हणाले की शनिवार रविवार व सुट्टीच्या दिवशी होणारे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पठारावरून एकेरी वाहतूक सुरू करण्याबाबत विचाराधीन आहे. राजमार्गावर व्हीआयपी वाहने न सोडता त्या ठिकाणी बैलगाडीचा वापर करण्यात यावा.
यासाठी सहा गावातील ज्या कोणाच्या बैलगाड्या असतील त्यांनी तीन दिवसात अर्ज करावेत. हंगाम कालावधीमध्ये पर्यटकांना होणारा त्रास लक्षात घेता सुट्टीच्या दिवशी पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे. परिसरात दहा ते पंधरा पोलीस कर्मचारी नेमणूक केले जाणार आहे. कास पठाराचे व्यवस्थापन करीत असताना कास पठाराची बदनामी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.
हंगाम कालावधीमध्ये सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन बुकिंग करून येणाऱ्या पर्यटकांनाच पठारावर प्रवेश देण्यात येईल तसेच ऑफलाइन पर्यटक येतील त्यांच्यासाठी दुप्पट प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले.
