कराड अर्बन बँकेच्यावतीने दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण
कराड प्रतिनिधी -दि कराड अर्बन को-ऑप. बँक लि., कराड बँकेच्या वतीने साडेतीन मुहुतपैिकी एक समजल्या जाणाऱ्या दसरा सणाच्या शुभ मुहुर्तावर बँकेच्या ग्राहकांना १५ कोटी पर्यंतचे विविध वाहन कर्ज बँकेच्या माध्यमातून वितरीत करण्यात आले आहे. त्यापैकी कराड शहरातील वाहनांचे पूजन श्री. समीर जोशी, डॉ.अनिल लाहोटी, संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य व मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांचे हस्ते करुन वाहनांचे वितरण करण्यात आले.
बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने सामाजीक उपक्रमांबरोबरच ग्राहकांना कमी व्याजदरात वाहने उपलब्ध करुन दिली आहेत. बँकेने नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकांना विविध शाखांच्या माध्यमातून एकूण १५ कोटी कर्जाचे वितरण केलेले असून यापैकी कराड विभागातून सुमारे ५ कोटी वाहन कर्जाचे वितरण करण्यात आलेले आहे. बँकेने नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकांचे हित लक्षात घेत घरगुती वाहन खरेदीसाठी ८.५०% व कमर्शिअल वाहन खरेदीसाठी ९.००% अशी योजना राबविली असून याला ग्राहकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. जीएसटीमधील कपातीचा वाहन खरेदी करताना ग्राहकांना चांगलाच फायदा झाला आहे.
नुकत्याच संपलेल्या अर्धवर्षाअखेरीस वार्षिक नियोजनाप्रमाणे बँकेने एकूण रुपये ५९०० कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण करीत नेट एन.पी.ए. चे प्रमाण शून्य टक्के कायम ठेवले आहे. बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाषराव जोशी, डॉ. सुभाष एरम यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्व सेवकांच्या सामुहिक योगदानामुळे हे यश मिळवता आले आहे, असे उद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. धनंजय शिंगटे यांनी वाहन वितरणाच्या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
कराड अर्बन बँक ग्राहकांना फक्त आर्थिक पतपुरवठा करत नाही तर योग्य सल्ला देवून आर्थिक शिस्त सुद्धा लावते. यामुळे ग्राहकांना आर्थिक प्रगती करणे सोपे जाते. कराड अर्बन बँक नेहमीच सर्वोत्तम ग्राहक सेवा देत आली असल्याचे समाधान वाहनधारकांनी व्यक्त केले.
यावेळी बँकेचे कराड शहर व कराड ग्रामीणचे उपमहाव्यवस्थापक अतुल शिंदे, विजय पाटील, शाखा अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
