जुन्या आठवणींमध्ये रमले वाई हायस्कूलचे माजी विद्यार्थी
वाई, दि. 30 – आपल्या गुरूजनांना वंदन करण्यासाठी व मित्र-मैत्रिणींच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळावा, या हेतूने येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालय अर्थात जुन्या लोकांचे वाई हायस्कूलमधील 1990 च्या दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा दि २१ जुलै रोजी नुकताच पार पडला. निमित्त होते गुरूपौर्णिमा आणि स्थळ होते धनश्री हाँटेल.
आपल्या गुरूजनांप्रती असलेली आपुलकी व गुरू पौर्णिमा निमित्ताने त्यांच्याशी संवाद, व्हावा, त्यांचे आशिर्वाद घेता यावेत, यासाठी या वर्गातल्या विद्यार्थ्यांनी या अनोख्या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यानिमित्त शाळेच्या वेळेत सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित राहिल्या. राष्ट्रगीताने कार्यक्रमास सुरूवात झाली. त्यावेळी असलेले शिक्षक श्री. नलवडे, श्री. पोतेकर, श्री. चव्हाण श्री. कोलार व सौ. चव्हाण आदी गुरूजन वर्ग या कार्यक्रमास उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांच्यावतीने त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला. सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या सुख, दुःखात सहभागी व्हावे. आपल्या परिने मित्रमंडळीच्या मुलांना सहकार्य करावे, म्हातारपणापर्यंत दरवर्षी स्नेहमेळाव्याचे आयोजन करावे. आपले विचार व अनुभव यांची देवाणघेवाण करावी, असे आवाहन यावेळी शिक्षकांनी केले.
प्रत्येकाने आपण करीत असलेले काम व शाळा सोडल्यापासून आलेले अनुभव सविस्तरपणे मांडले. शाळेने दिलेली शिदोरी प्रत्येकाने आपल्या ओघवत्या शैलीत मांडली. माधुरी अडसूळ, विजय जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. स्नेहमेळाव्याचे संयोजन वाई अर्बन बँकेतील अधिकारी संतोष क्षीरसागर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप जायगुडे, शेरखान शेख, माजी सैनिक विजय जमदाडे, धनश्री हाँटेलचे मालक संतोष राजपुरे, प्राथमिक शिक्षिका सौ. माधुरी अडसूळ, सौ. माधुरी धर्माधिकारी, सौ. जोस्ना गायकवाड, जनता अर्बन बँकेतील अधिकारी सौ. नीलम गार्डे, डाँ. सुषमा भोसले, सुनील गुरव, डॉ. नितिन शिंदे, मंगेश पवार, राजेंद्र मुळे, शिवाजी जमदाडे,आदींनी पुढाकार घेऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले. स्नेहमेळाव्यात 60 हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.