आगामी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार नाही! जो बायडन यांची माघार
जगातील बलाढ्य अमेरिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या असून सध्या जगातील महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देशातील राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर सभेत हल्ला झाला होता . तेव्हापासूनच अमेरिकेचं राजकारण तापल्याचं पाहायला मिळत होतं. अशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या एका घोषणेनं प्रचंड खळबळ माजल्याचं पाहायला मिळत आहे.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रविवारी एक मोठी घोषणा केली. त्यांनी 2024 मध्ये होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून आपलं नाव मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. यासोबतच त्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आता दावेदार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. बायडन यांच्यानंतर कमला हॅरिस या राष्ट्राध्यक्ष पदासाठी पुढील दावेदार असतील. गेल्या काही दिवसांपासून पक्षातील नेतेमंडळीच बायडन यांच्यावर दबाव आणत असल्याचं बोललं जात होतं. त्याचवेळी जो बायडन यांनी हा निर्णय घेतल्यामुळे अमेरिकेच्या राजकारणत प्रचंड उलथापालथ पाहायला मिळत आहे. जो बायडन यांच्या सहकाऱ्यांनीच आगामी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ते कमकुवत उमेदवार असल्याचं सांगितलं होतं.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या घोषणेपासून अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत रंजक वळण पाहायला मिळत आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आगामी अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाची राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक ते लढवणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. स्वतः पत्र लिहून त्यांना हा निर्णय जाहीर केल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच बायडन पुढील आठवड्यात देशाला संबोधित करणार आहेत.