जातीपातीच्याही पलीकडलं आपलं सर्वांचं वेगळं नातं आ.शिवेंद्रसिंहराजे;
भुईंज (महेंद्रआबा जाधवराव )मुस्लिम समाजाचा मताधिक्य देण्याचा निर्धार सातारा एक शांत शहर म्हणून ओळखलं जातं. आम्ही असू किंवा आमचे पूर्वज असुद्या, सर्वानीच साताऱ्यात जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे काम केले. आजही मी असो किंवा उदयनराजे असतील दोघेही जातीपातीपेक्षा सामाजिक शांतता आणि सलोखा याला कायम प्राधान्य देतो. शेवटी जातीपातीच्या पलीकडेही सातारकर म्हणून आपलं एक घट्ट नातं आहे. काहीही झालं तरी हे नातं कायम अबाधित राहील आणि आम्ही समाजातील सर्व घटकांच्या सेवेत कुठेही कधीही कमी पडणार नाही, असा शब्द आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिला.
सातारा- जावली मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुस्लिम समाजाशी संवाद साधला. यावेळी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी भाजपचे लोकसभा संयोजक सुनील काटकर, प्रसिद्ध उद्योजक बाबाशेठ तांबोळी, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अमिनशेठ कच्छी, युसुफभाई पटेल, बागवान समाज अध्यक्ष परवेज भाई बागवान, महाराजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सादिक शेख, मुक्तार पालकर, अल्ली शेठ, माजी नगराध्यक्ष नासिर शेख, नगरसेवक शकील बागवान, बाळासाहेब खंदारे, जयवंत भोसले, इर्शाद बागवान, इंतेखाब बागवान, सादिक शेख, सुजित शेख, हाजी शकील शेख, मुसा मुल्ला, अस्लमशेठ कुरेशी, सलीम कच्छी, हानिफ कच्छी, समीर आतार, इम्तियाज मुजावर, डॉ. गफार मोमीन, वसिम सय्यद आदी मान्यवरांसह सातारा शहर, सातारा तालुका आणि जावली तालुक्यातील हजारो मुस्लिम बांधव उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, जावळीला छत्रपतींचा फार मोठा इतिहास आहे. जावली सुद्धा साताऱ्यातच आहे. माझा सातारा आणि जावली या दोन्ही तालुक्यांशी फार मोठा ऋणानुबंध आहे. या दोन्ही तालुक्यातील जनतेचे सर्व प्रकारचे प्रश्न नेहमीच सोडवले आहेत आणि कायम सोडवणार आहे. मुस्लिम समाजाचे विविध प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी, विविध विकासकामे करण्यासाठी सातत्याने भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. या निवडणुकीत मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधव आणि भगिनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आपल्याला विजयाची खात्री आहे. तरीही कोणीही गाफील न राहता जास्तीत जास्त मतदान करून मला विक्रमी मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन शिवेंद्रसिंह राजे यांनी केले.