इतिहासाचा वसा व वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या तरुणाईवर : प्रा.सूर्यकांत अदाटे
राष्ट्रीय सेवा योजना हे सर्वांगीण विकासाचे आणि संस्काराचे व्यासपीठ असून इतिहासाचा वसा व वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या महाविद्यालयीन तरुणाईवर आहे, असे प्रतिपादन प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊरचे प्राध्यापक व दुर्ग अभ्यासक सुर्यकांत अदाटे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पार्थ पाटोळे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स, कराडच्या घोणशी गावात राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रम संस्कार शिबिराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘भ्रमंती साताऱ्यातील गडकोटांची’ या विषयावर ते बोलत होते. प्रा.अदाटे पुढे म्हणाले कि, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गावातील, तालुक्यातील आणि जिल्ह्यातील गडकोटांची आणि मंदिरांची ओळख करून घेतली पाहिजे. आज कित्येक गडावरील प्रवेशद्वारे, देवड्या, जंग्या, पाण्याची टाके, चुन्याचे घाणे, विरगळ, सतीशीळा आणि गड अवशेष काळाच्या ओघात नष्ट होऊ लागलेले आहेत. आज साताऱ्यातील प्रत्येक गडकोटांच्यासाठी संवर्धन करणारी संस्था असली तरी आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी जाऊन स्वच्छता, प्लास्टिक निर्मुलन करून सर्वधनाच्या कार्यास हातभार लावून ऐतिहासिक वारसा असणारे गडकोट आणि त्यावरील वास्तूंचे जतन केले पाहिजे. यावेळी त्यांनी शिबिरार्थींना सातारा जिल्ह्यातील २४ गडांची ओळख करून दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्री. संजय पिसाळ म्हणाले कि स्वातंत्र्यपूर्व काळापासून घोणशी गावाने भूमिगतांना मदत केलेली असून घोणशी गावाला स्वतंत्र इतिहास आहे. यशवंतरावजी चव्हाण यांनी स्वातंत्र्यपूर्व कालखंडात या गावास भेट देऊन स्वातंत्र्यसंग्रामात येथील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन लढा दिलेला होता त्यामुळे या गावाच्या इतिहासाची आपण ओळख करून त्याचे जतन आपण केले पाहिजे असे त्यांनी सांगितले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी मा. चोरगे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी माणसात देव पाहिला पाहिजे असे सांगितले. यावेळी यशवंतराव चव्हाण कॉलेजचे प्रा.अर्जुन भिंगारे यांनी ३० किमीचा प्रवास धावत पूर्ण करून विद्यार्थ्यांना शारीरिक आरोग्याचे महत्त्व समजावून सांगितले.
सदर कार्यक्रमात स्वयंसेवक गणेश मिस्कुळ याने सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन स्वयंसेविका ऐश्वर्या कदम हिने मानले. कार्यक्रमास राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. अरविंद जाधव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अजितकुमार लोळे, डॉ. गोविंदा कदम, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.कमलसिंग क्षत्रिय, सौ. प्रीतम शिंदे, सौ. गीता बुरुड तसेच घोणशी गावच्या सरपंच सौ.सुवर्णा अडसुळे, महाराष्ट्र राज्य कंजूमर फेडरेशन माजी अध्यक्ष श्री. किसनराव पाटील, सह्याद्री सहकारी साखर कारखाना संचालक व चेअरमन कराड मर्चंट बँक मा.श्री.माणिकराव पाटील आणि घोणशी गावचे पदाधिकारी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
