कृषी क्षेत्रामध्ये अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक – डॉ. शिवाजीराव पाटील
शासकीय कृषी महाविद्यालय, कराड येथे राष्ट्रीय कृषी शिक्षण दिन कार्यक्रमाचे आयोजन!
कराड -आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये कृषी क्षेत्रासमोर असणारी आव्हाने बदलत आहेत. वैश्विक तापमानामध्ये वाढ होत आहे. हवामान व ऋतुचक्रामध्ये सातत्याने बदल होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेतीमधील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, सेन्सर्स, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम यांसारख्या काटेकोर शेतीमधील अत्याधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील यांनी केले. डॉ. राजेंद्र प्रसाद यांचे जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय कृषी शिक्षण दिनानिमित्त कराड येथील शासकीय कृषी महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्रभारी सहाय्यक कुलसचिव डॉ. सुनिल अडांगळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. ज्योती वाळके, शैक्षणिक प्रभारी डॉ. रामचंद्र हसुरे, मुख्य समुपदेशक डॉ. संपत कोळपे तसेच प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. पाटील विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना म्हणाले की कृषी क्षेत्राची आतापर्यंतची वाटचाल व भविष्याकालीन अपेक्षित बदल यांचा विचार होणे गरजेचे आहे. अन्न ही मानवाची मुलभूत गरज आहे आणि ती भागविण्याचे कार्य कृषी क्षेत्र करते. आजही आपल्या देशातील साठ टक्के लोकसंख्या शेतीवर विसंबून आहे आणि आपल्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा अठरा टक्के वाटा आहे. या सर्व बाबींचा विचार करता कृषी क्षेत्र हे देशविकासामधील एक महत्वपूर्ण घटक असल्याचे दिसून येते. कृषी क्षेत्राची व्यापकता पाहता या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी भविष्यात अनेकविध संधी उपलब्ध असल्याचे मत डॉ. पाटील यांनी व्यक्त केले.
डॉ. कोळपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की अन्नधान्यातील उत्पन्न वाढीबरोबरच त्यामधील पोषक द्रव्ये यांचेकडे लक्ष देणे हे आजच्या परिस्थितीमध्ये गरजेचे आहे. सेंद्रिय शेती सारख्या पर्यांयाचा विचार व अवलंबन याबाबत आजच्या कृषी पदवीधारकांनी कार्य केले पाहिजे अशी अपेक्षा डॉ. कोळपे यांनी यावेळी व्यक्त केली.
डॉ.ज्योती वाळके यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर डॉ.अर्चना ताठे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुनिल अडांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयामधील सर्व विद्यार्थी उपस्थित होते