भारतीय जनता पार्टी तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा –“निरोगी आरोग्यासाठी योग साधना गरजेची” – आमदार मनोजदादा घोरपडे
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त साताऱ्यात योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न
सातारा -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सातारा जिल्हा भाजपा महिला मोर्चा आणि सातारा हिल रनर्स यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. 21 जून 2026 रोजी , राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट उड्डाण पुलाच्या खालील जागेत भव्य योगसाधना शिबिराचे आयोजन करण्यात आले. सातारा हिल रनर्स यांच्या माध्यमातून पार पडलेल्या या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी भाजपा आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “निरोगी आरोग्यासाठी योग साधना गरजेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगाचे महत्त्व पटवून दिले. रोजच्या धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त राहण्यासाठी योग हाच खरा मार्ग आहे.”
जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रियाताई शिंदे यांनी “रोज थोडा वेळ योग साधना करून आपले आरोग्य उत्तम ठेवा ” हा संदेश सर्वांना दिला
या शिबिराचे नेतृत्व सातारा जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा तेजस्विनीताई घोरपडे यांनी केले. याप्रसंगी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा प्रियाताई शिंदे, स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा समता ताई घोरपडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, योगा दिन संयोजक गणेश जाधव, सातारा नगरपालिका आरोग्य सभापती धनंजय जांभळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिवनामे , नगरसेविका रीना भणगे, नगरसेवक रवी पवार, सातारा बाह्य मंडल अध्यक्ष वैशाली टंगसाळे, वैष्णवी कदम , योगा प्रशिक्षक कुंजा खंदारे , सरचिटणीस विक्रम बोराटे, अक्षय भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी योगाचे धडे घेत योगाभ्यासात सहभाग नोंदवला.
योगाचे महत्त्व पटवून दिले
शिबिराच्या प्रारंभी योगाचे महत्त्व, इतिहास व निरोगी जीवनातील उपयुक्तता याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर सातारा हिल रनर्सचे संस्थापक डॉ. सुधीर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचा सराव करून घेण्यात आला. डॉ. पवार यांनी योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक फायदे विशद केले.
या सत्रात सौ. मनीषा घार्गे, सौ. स्वाती ढाणे आणि डॉ. नीलिमा पवार यांनी विविध योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. सातारा हिल रनर्सच्या उपक्रमासाठी सौ. मनीषा घार्गे यांनी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थित मान्यवरांनी मांडली मते शिबिरानंतर मान्यवरांनी योगाचे महत्त्व आणि नियमित योगाभ्यासाचे फायदे याविषयी मनोगत व्यक्त केले. मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचा समारोप “करू योग, राहू निरोग” या संदेशासह करण्यात आला




