नीरा देवघर प्रकल्पातून शेती सिंचनाचे तंतोतंत नियोजन आमदार मकरंद पाटील यांचा पुढाकार
खंडाळा तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली
खंडाळा : खंडाळा तालुक्यातील नीरा देवघर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या तीनही उपसा सिंचन योजना मार्गी लावून तालुक्यातील या प्रकल्पांतर्गत येणारे संपूर्ण शेती क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे स्पष्ट करीत नीरा देवघर आणि धोम बलकवडी प्रकल्पाचे खंडाळ्याच्या वाट्याचे पाणी कुठेही जाऊ दिले जाणार नाही. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण करण्याचा प्रयत्न काही लोक करीत आहेत त्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी. पाण्याबाबत कोणीही राजकारण करु नये असे आवाहन आमदार मकरंद पाटील यांनी केले.
नीरा देवघर प्रकल्पांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकर्यांच्या समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रकल्प अधिकारी यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी आमदार मकरंद पाटील , कार्यकारी अभियंता स्वप्नील कोडुलकर , उपविभागीय अभियंता रामचंद्र घनवट , सुरेंद्र पवार , शाखा अभियंता कमलाकर पवार , प्रतिक दिक्षीत , उदय कबुले , दत्तानाना ढमाळ , नितीन भरगुडे पाटील , मनोज पवार , शामराव गाढवे , विनोद क्षीरसागर , सुभाष साळुंखे , सुनील शेळके ,राजेंद्र नेवसे , बाळासाहेब साळुंखे , अजय भोसले , संभाजी साळुंखे , गणेश धायगुडे पाटील , धनाजी अहिरेकर , साहेबराव धायगुडे यांसह शेतकरी वर्ग उपस्थित होते.
यावेळी नीरा देवघर प्रकल्पाच्या झालेल्या व नियोजित कामांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये लोणंद येथील ६५ हेक्टर साठी पाणी उपलब्ध करणे तसेच ज्या ठिकाणी नैसर्गीक प्रवाहाने पाणी जाऊ शकत नाही तेथे पाणी उपसा करून दयावे लागेल. तुळशी वृंदावन धरण भरले तर त्याखालील क्षेत्राला पाणी मिळेल. वाघोशी लिफ्ट मधून पाणी उचलणे व प्रवाही मार्गाने पाणी देणे. मांगडोह परिसरातील शेतीला पाणी पोहोच करणे . तुळशी वृंदावनच्या पूर्वेच्या बाजूला ‘ खेमावती आणि सरहद्दीचा ओढा येथे वॉश आऊट टाकले तरच ओढ्याने पाणी प्रवाही होईल अशा सूचना करण्यात आल्या. वाघोशी येथील खंडोबादरा , लवणदरा , भवानीदरा या भागात पाणी योजना पोहचवणे त्यासाठी सर्वेक्षण करणे . कराडवाडी पाझर तलाव व दक्षिणेचा भाग पाणी देणे . अंदोरी पश्चिम डोंगर भागाला पाणी देणे. मोर्वे कालव्याची दक्षिण बाजूच्या शेती क्षेत्राला व वडझलचा फिडरमध्ये वाढ करणे.
वाठार बुद्रुक येथील ६५० एकर क्षेत्राला ८ इंची पाईपने पाणी पुरणार नसल्याने तेथे उपाययोजना करणे त्यासाठी तीन आऊटलेट द्वारे पाणी देण्यात यावे तसेच भादे येथील ताटे धरण स्वतंत्र लाईन टाकणे. नायगाव ,जवळे ,पळशी व परिसरातील भागाची क्षेत्र पाहणी करून नियोजन आराखड्यात दुरुस्ती करणे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
नीरा देवघर योजनेबाबत लोकांमध्ये अनेक चुकीच्या समजूती आहेत त्या दूर करून लोकांना वास्तव माहिती मिळावी तसेच त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांनी प्रत्यक्ष गावकऱ्यांशी संवाद साधला आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत असलेला संभ्रम दूर होणार आहे.
