सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर मार्गाच्या कामांचा आढावा; अधिकाऱ्यांना गती देण्याच्या सूचना- मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले
वाई : सुरूर–वाई–महाबळेश्वर–पोलादपूर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गावरील सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर तालुक्यातील विविध रस्ते विकास कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी स्थानिक नागरिकांच्या मागण्या आणि तक्रारी ऐकून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. खराब रस्ते, रखडलेली कामे आणि वाहतुकीच्या अडचणी याबाबत नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. कामांची गुणवत्ता आणि गती वाढवून नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा, असेही यावेळी सांगण्यात आले.
या बैठकीस, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री मकरंद आबा पाटील, आमदार मनोज कायंदे, सचिव (रस्ते) संजय दशपुते, एमएसआयडीसीचे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा येथील अधीक्षक अभियंता तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.तसेच महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे, पाचगणीचे नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.
या आढावा बैठकीमुळे परिसरातील रखडलेल्या रस्ते विकास कामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




